
सिंधुदुर्ग : मराठी भाषा विभागाच्यावतीने पुणे शहरातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या 'विश्व मराठी संमेलना' मध्ये ज्येष्ठ साहित्यिक, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना 'विश्व मराठी साहित्य संमेलन भूषण पुरस्कार' प्रदान करून गौरविण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यानिमित्ताने जगभरातून आलेल्या मराठी भाषिकांसमोर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. अभिजात भाषा पाठपुरावा समितीचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे, लक्ष्मीकांत देशमुख, संजय नाहर आणि रवींद्र शोभणे यांचा विशेष म्हणजे सन्मान करण्यात आला. तसेच ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना 'विश्व मराठी साहित्य संमेलन भूषण पुरस्कार' प्रदान करून गौरविण्यात आले. कौशल्य विकास विभागाचे 'सिद्ध' या डिजिटल ऍपचे उद्घाटन देखील यावेळी करण्यात आले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिले विश्व मराठी संमेलन आहे. मराठी भाषेला हा दर्जा दिल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठी साहित्य हे मराठी भाषेला जीवंत ठेवणार साहित्य आहे. आजच युग एआय आहे. तंत्रज्ञानाला घाबरायच नसतं, नाकारायचही नसतं. ते घोड्याप्रमाणे असतं त्यामुळे त्यांच्यावर स्वार होऊन बसायच असतं. त्याचा उपयोग आपल्या प्रचार आणि प्रसारासाठी करायचा असतो असे सांगत पाच वर्षांत एक मराठी संमेलन परदेशातही भरवू, जगभरात मराठीचा डंका वाजल्याशिवाय राहाणर नाही असं प्रतिपादन केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी जसा माझ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे तसाच मराठी भाषेचा देखील कार्यकर्ता आहे. काही दिवसांपूर्वी या मैदानावर पुस्तकांचा मेळा भरला होता, तर आज साहित्यिकांचा मेळा भरला आहे. त्यामुळे हा अनोखा कुंभमेळा भरला असल्याचे मत याप्रसंगी संवाद साधताना व्यक्त केले. तसेच येत्या फेब्रुवारी महिन्यात नवी दिल्ली येथे ९८ वे साहित्य संमेलन होत आहे, अशात विश्व साहित्य संमेलनाचा घाट कशाला असा सूर उमटत आहे. मात्र दोन्ही ठिकाणी साहित्यिक मंडळी एकत्र येणार असल्याने ही दोन्ही संमेलने यशस्वी होतील असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला. या संमेलनासाठी २२ देशांतून मराठी प्रेमी आले असून यंदा त्यांची संख्या ३०० असली तरीही पुढच्या वर्षी अजूनही नक्की वाढेल असा विश्वास यासमयी व्यक्त केला. तर उप मुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मराठी भाषा ही प्राचीन आणि प्रचलित आहे, या भाषेसाठी दिलेला लढा हा अभिमानास्पद असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उद्योग आणि मराठी भाषा विकास मंत्री उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकिर, सिद्धार्थ शिरोळे, बापू पठारे, मराठी भाषा विभागाच्या सचिव सौ.मनीषा म्हैसकर तसेच साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.