
सावंतवाडी : सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून शाश्वत सेवा केल्याबद्दल, या कौतुकास्पद कार्याची दाखल घेऊन राष्ट्रीय पुरस्कार वितरण समिती, बेळगावी तर्फे दिल्ली, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यातील निवडक व्यक्तींमध्ये कुणकेरी गावचे पोलीस पाटील तानाजी सावंत यांची निवड करत त्यांना "राष्ट्रीय आदर्श सामाजिक सेवा गौरव पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले. गोवा येथे मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
गोवा येथील राज्यस्तरीय कार्यक्रमात कर्नाटक सरकारचे जिल्हा पोलिस प्रमुख, एसपी बिदर महेश मेघण्णावर यांच्या हस्ते तानाजी सावंत यांचा सत्कार करण्यात आला. नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन (रजि.) बेळगावी व इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी (रजि.) चि. बेळगावी तर्फे देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी निवडक व्यक्तिमध्ये त्यांची निवड करण्यात आली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय आदर्श सामाजिक सेवा गौरव पुरस्कार तानाजी सावंत यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी माजी सभापती प्रमोद सावंत, कुणकेरी माजी सरपंच कुणकेरी विश्राम सावंत, माजी उपसरपंच लक्ष्मण सावंत, सौ.वैशाली सावंत, विजय सावंत, मंगेश सावंत, सुर्याजी सावंत आदी उपस्थित होते. या पुरस्कारानंतर तानाजी सावंत यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.