अनिकेत बापट यांचा प्रयागराज मध्ये विशेष सन्मान

Edited by:
Published on: February 23, 2025 11:59 AM
views 451  views

चिपळूण : प्रयागराज येथे २० फेब्रुवारी रोजी विश्व हिंदू परिषदेच्या अखिल भारतीय गोरक्षा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रमुख श्री. दिनेश उपाध्याय, सर्व केंद्रीय पदाधिकारी व संत उपस्थित होते. गोरक्षण व संवर्धनासाठी विविध राज्यांमध्ये गोसेवा आयोगाच्या माध्यमातून चांगले काम करणाऱ्या चार राज्यांच्या अध्यक्षांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. यात महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. शेखर मुंदडा , विश्व हिंदु परिषदेचे गोरक्षा प्रमुख श्री. भाऊराव कुदले , उत्तर प्रदेशचे गोसेवा आयोग प्रमुख श्री. श्याम बिहारी गुप्ता , हरियाणाचे श्री. श्रवणकुमार गर्ग, छत्तीसगडचे श्री. विश्वेश्वर पटेल तसेच हजारों लोकांच्या उपस्थितीत श्री.  अनिकेत अनिल बापट यांचा राष्ट्रीय प्रमुख मा. श्री. उपाध्याय साहेबांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. 

कोकणातून गोवंशाची नष्ट होत चाललेली कोकणात कपिला ही गोवंश जातीच्या गाई , खोंड, यांची ते  जोपासना करत , त्यांच्या वंश वृद्धीकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलेले आहे. यामध्ये उत्पन्नाचे साधन म्हणून गाईंचे  दूध न घेता, स्वतः कष्ट  करत गोवंशाचे , उत्तम प्रतिचे गोमय - गोमूत्र मिळवण्यावर ते भर देतात.  अनिकेेत बापट हे  अधिकृत परवानाधारक आणि शास्त्र शुद्ध दर्जेदार पंचगव्य आयुर्वेदिक उत्पादनं - औषध निर्मिती, पंचगव्य निसर्गोपचार तज्ञ अशा क्षेत्रात कार्य  करत आहेत. ते काही गोशाळा आणि काही आयुर्वेदिक कंपन्यांसोबत देखील काम करत आहेत. ते करत असलेल्या ह्या उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली असून प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभ मेळ्याच्या पवित्र पुण्यभूमि मध्ये अनिकेत बापट यांचा विशेष सन्मान करण्यात आला. गोरक्षा, देशी गोसंगोपन, पंचगव्य  उत्पादन निर्मिती, पारंपारिक पंचगव्य चिकित्सा या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या भारतातील विविध लोकांचा सत्कार करण्यात आला असून महाराष्ट्रातून केवळ पंचगव्य निसर्गोपचार तज्ञ अनिकेत बापट आणि डॉ. नितेश ओझा यांचा सत्कार करण्यात आला आहे.