स्व. प्रा. मिलींद भोंसले स्मरणार्थ मराठी विषयासाठी विशेष पारितोषिके

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य
Edited by: विनायक गांवस
Published on: January 21, 2026 18:17 PM
views 60  views

सावंतवाडी : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून श्रीमती मानसी मिलिंद भोंसले यांनी मराठी भाषेचे स्व. प्रा.मिलिंद दत्ताजीराव भोंसले यांच्या स्मरणार्थ सावंतवाडीच्या शिक्षण प्रसारक मंडळाकडे रु. २५ हजारची कायमस्वरुपी ठेव दिली असून त्याच्या व्याजातून दरवर्षी बारावी परीक्षेत आरपीडी ज्युनि. कॉलेजमध्ये कला व्यापार व शास्त्र या शाखेतून मराठी विषयात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी पारितोषिके देण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर यांनी दिली.

शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर यांच्याकडे हा धनादेश निरज भोसले व श्रीमती मानसी भोसले यांनी सुपूर्द केला. राज्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये / महामंडळे सर्व बँका, शैक्षणिक संस्थामधून राज्यभाषा मराठीचा जास्तीत जास्त वापर व्हावा या हेतूने दरवर्षी मराठी "भाषा संवर्धन पंधरवडा" १४ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीत महाराष्ट्रात साजरा केला जातो. या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी शासन परिपत्रक सर्व कार्यालयांना पाठविलेले असून राज्यातील सर्व कार्यालयांनी कोणते कार्यक्रम आयोजित करावे याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. श्रीमती मानसी मिलिंद भोंसले यांनी शिक्षण प्रसारक मंडळाला दिलेल्या ठेवीनंतर शिक्षण प्रसारक मंडळाकडे रु. तेवीस लाखाहून अधिक रक्कमेच्या ठेवी बक्षिसांसाठी प्राप्त झालेल्या आहेत.

स्वर्गीय मिलिंद भोसले यांच्या स्मरणार्थ भोसले कुटुंबियांनी शिक्षण प्रसारक मंडळाला दिलेल्या देणगी बद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत विकास सावंत सचिव  व्ही.बी. नाईक, खजिनदार सी. एल्. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत तसेच सर्व संचालक आरपीडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका श्रीमती संप्रवी कशाळीकर, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक धुरी, पर्यवेक्षक नामदेव मुठे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी आभार मानले.