LIVE UPDATES

मुलाचा मृत्यू ; धक्क्याने वडिलांनीही सोडलं जग

Edited by:
Published on: June 04, 2025 15:23 PM
views 2129  views

सावंतवाडी : कारिवडे धरणावर मित्रांसोबत फिरण्‍यासाठी गेलेल्‍या सावंतवाडी शहरातील जुनाबाजार येथील १८ वर्षीय युवक क्रिश सावियो संभया याचा तोल जावून तो पाण्‍यात कोसळल्‍याने दुर्देवी अंत झाला. काल सायंकाळी साडेपाच वाजण्‍याच्‍या सुमारास ही घटना घडली असली तरी, त्‍याचा मृतदेह रात्री ११ वा. पाण्‍यावर तरंगताना आढळला. मात्र आपल्‍या मुलाचे निधन झाल्‍याची बातमी क्रिशचे वडील सावियो संभया यांच्‍या कानावर येताच त्‍यांना हा धक्‍का सहन झाला नाही, त्‍यांना मानसिक धक्‍का बसला, आणि हृदयविकाराच्‍या धक्‍क्‍याने त्‍यांनाही काळाने कवटाळले. या घटनेने सावंतवाडीकरांचे हृदय हेलावून गेले. 

क्रिश हा काल सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास फोटो काढायला जात असल्याचे घरी आईला सांगून आपल्या दुचाकीने मित्र-मैत्रिणींसह कारीवडे धरणावर फिरायला गेला होता. धरणाच्या ठिकाणी फोटो काढत असताना त्याचा अचानक तोल गेला आणि तो पाण्यात पडला. ही घटना घडल्यानंतर तात्काळ पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी तसेच बाबल अल्मेडा यांच्या रेस्क्यू टीमने सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत धरणाच्या पाण्यात क्रिशचा शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. अखेर, रात्री ११ वाजता त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला. त्यानंतर तो पाण्यातून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच त्याचे वडील सॅव्हीयो संभया यांचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्‍यू झाला. एकाचवेळी बाप आणि मुलाच्‍या अशा अचानक जाण्‍याने सावंतवाडीकर हळहळले.