
सावंतवाडी : एक महिन्यापूर्वी सिव्हिल सर्जन यांची भेट घेऊन सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांच्या माध्यमातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांसाठी विविध सोयी सुविधां बरोबरच सोनोग्राफी मशीन उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर नागरगोजे यांना प्रत्यक्ष भेटूनच निवेदन देण्यात आले होते. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सोनोग्राफी रुग्ण तपासणी सेवा उपलब्ध नसल्याकारणाने गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांना बाहेरून तपासणी करण्यासाठी हजार ते पंधराशे रुपये मोजावे लागत होते. ते आता जेष्ठ नागरिक तसेच वीस हजारच्या आत उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी तहसीलदारांकडून उत्पन्नाचा दाखला उपलब्ध झाल्यास अंध ,अपंग, मूकबधिर, कर्णबधिर, मतिमंद, एच आय व्ही, टी.बी, कॅन्सरग्रस्त, मलेरिया, स्वाईन फ्ल्यू, चिकनगुनिया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, गरोदर महिला, थायलेमिशिया अशा आजार असलेल्या रुग्णांसाठी सोनोग्राफी तपासणी सेवा मोफत मिळणार आहे.
तसेच इतर रुग्णांसाठी ही सेवा 200 ते 250 इतक्या माफक दरात ही सेवा उपलब्ध होणार आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये 15 मार्चला सोनोग्राफी मशीन उपलब्ध झालेली आहे मशीनचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर टेक्निशन लवकरात लवकर उपलब्ध करून देणार व त्यानंतर ही सेवा रुग्णांना दिली जाणार आहे, अशी माहिती सिव्हिल सर्जन डॉक्टर नागरगोजे यांनी सामाजिक बांधिलकीला दिली आहे.
यासाठी सिव्हिल सर्जन डॉक्टर नागरगोजे व जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुबोध इंगळे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केल आहे. सावंतवाडीच्या जनते तर्फे त्यांचे विशेष आभार मानण्यात आले आहे तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर व बालरोगतज्ञ डॉक्टर संदीप सावंत यांचेही आभार सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून मानण्यात आले आहे.