
चिपळूण : रायगडची सुकन्या व सध्या चिपळूणमध्ये शिकणानिमित्त वास्तव्यास असलेली सोनाक्षी कल्याणी विनीत मेहता हिने अवघ्या ५ वर्षे ३ महिने वयातच "इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड" सन २०२५ मध्ये आपली नोंद करत यंगेस्ट आयबीआर अचिव्हर हा बहुमान पटकावला आहे. तिच्या असामान्य बुद्धिमत्ता व कौशल्यामुळे ती सर्वात लहान वयातच फळ आणि आरोग्याची माहिती असणारी, आरोग्यासाठी फळांचा योग्य सल्ला देणारी ती एक मार्गदर्शकच बनली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून भाजपा चिपळूण शहर चिटणीस सौ. प्रणाली अविनाश सावर्डेकर यांनी तिचे विशेष कौतुक केले आहे.
सोनाक्षी हिने ७६ सामान्य ज्ञान प्रश्नांची उत्तरे देताना, ३५ आरोग्यविषयक समस्या आणि त्यावरील फळांद्वारे नैसर्गिक उपाय, २२ फळे व भाज्यांचे फायदे, ३ वनस्पती आणि १६ वास्तुशास्त्र विषयक प्रश्न यशस्वीपणे उत्तरले आहेत. याशिवाय तिने २९ फळे आणि २६ क्रियापदे ओळखून सांगण्याचा विक्रम केला आहे. तसेच तिने ७ संस्कृत श्लोकांचे पठण आत्मविश्वासाने सादर केले असून, तिच्या वयाच्या दृष्टीने हे सर्वच उल्लेखनीय आहे.
तिची आई कल्याणी विनीत मेहता या "बाल आणि युवा विकास प्रशिक्षक" असून सोनाक्षी ब्रेन डेव्हलपमेंट अकॅडमी, चिपळूणच्या त्या संस्थापक आहेत. ब्रेन ॲण्ड माईंड फिटनेस प्रोग्रॅम अंतर्गत मुलांचे खेळ व ध्यानाच्या माध्यमातून शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकास घडवून आणतात. तिचे वडील विनीत नंदकुमार मेहता हे एबी मौरी एमएनसी कंपनीमध्ये डेप्युटी मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. सोनाक्षीच्या नवनवीन शिकण्याच्या, पुस्तक वाचनाच्या तसेच ध्यानाच्या सवयीमुळे तिने हे मोठे यश मिळवले आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे.