काहींकडे दुर्लक्ष करायचं असतं..!

मंत्री केसरकरांचा तेलींना टोला
Edited by: विनायक गावस
Published on: February 10, 2024 09:56 AM
views 393  views

सावंतवाडी : काही लोकांकडे दुर्लक्ष करण चांगलं आहे‌. संजय राऊत यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो तसंच जिल्ह्यातील काही लोकांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे असं विधान करत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भाजपचे माजी आमदार राजन तेली यांच नाव न घेता टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणाऱ्या भुमिपूजनांच राजन तेली यांनी आधीच भुमिपूजन केल्याबद्दल केसरकर यांना विचारलं असता त्यांनी तेलींचा समाचार घेतला. 

सिंधुदुर्गतील मुलं हुशार आहे‌. त्यामुळे आज राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन सावंतवाडीत आयोजित केलं आहे‌. महाराष्ट्रातील मुलांमध्ये हुशारी असल्यानं त्यांना सिंधुदुर्गच वैभव पहाता यावं यासाठी हा सोहळा कोकणात आयोजित केला आहे. नक्कीच भविष्यात देशाला चांगले वैज्ञानिक इथून मिळतील असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला‌.

दिव्यांग मुलांनी या ठिकाणी आणलेल्या वैज्ञानिक प्रतिकृती नक्कीच सर्वांनी पहाव्यात असं आवाहन केलं. तर राज्यभरातून आलेल्या मुलांच आदरातिथ्य कोकणी जनतेन राखाव असं ते म्हणाले. शिक्षण विभाग व भोसले नॉलेज सिटीन या प्रदर्शनासाठी मेहनत घेतली असून त्यामुळेच आज हा भव्य सोहळा होऊ शकला अस दीपक केसरकर म्हणाले. आज नळपाणी योजना व माजगाव येथील धरणाचा शुभारंभ झाला. लवकरच फणसवडे येथे देखील असा प्रकल्प होत आहे. विकासासाठी १५० कोटींचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या मतदारसंघासाठी दिला आहे असं ते म्हणाले.