वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयाच्या समस्या त्वरित सोडवा

ठाकरे शिवसेने तर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा
Edited by: दिपेश परब
Published on: August 31, 2023 18:39 PM
views 230  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयाच्या झालेल्या दुरावस्थेबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांची गुरुवारी (३१ ऑगस्ट) भेट घेऊन विविध समस्यांवर लक्ष वेधले. दरम्यान येत्या ८ दिवसांत सर्व उपजिल्हा रुग्णालया बाबत मांडलेल्या मुद्दयांची पुर्तता न झाल्यास दिनांक ८ सप्टेंबर रोजी वेंगुर्ला तालुका ठाकरे शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

यावेळी ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख यशवंत परब, ओबीसी उपजिल्हाप्रमुख निलेश चमणकर, शहरप्रमुख अजित राऊळ, वायंगणी माजी सरपंच सुमन कामत, अल्पसंख्याक तालुका प्रमुख रफिक बेग, विभागप्रमुख संदीप पेडणेकर आदी पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांचे खालील मुद्यांवर लक्ष वेधले. यात उपजिल्हा रुग्णालयामध्ये शासकीय नियमानुसार मंजुर वैदयकीय अधिकारी पदे उपलब्ध करून देण्यात यावीत. डॉक्टर, इंचार्ज सिस्टर -२ आणि सफाई कर्मचारी यांचे एप्रिल पासून पगार नाहीत. गेल्या एक महिन्यापासून कनिष्ठ लिपिक आठवडयातून एखाद दुसरा दिवस हजर राहतात त्यामुळे निधी खर्च करणे, विवाह नोंदणी करणे, ऑफीससची कामे सर्व होत नाहीत यामुळे नविन लिपिक देण्यात यावा. औषधनिर्माण अधिकारी वेळेवर डयुटीवर हजर राहत नाहीत त्यामुळे रुग्णांना थांबून राहावे लागते. रुग्णालयातील लाईट गेल्यानंतर जनरेटर असून डिझेल उपलब्ध नाही.  प्रयोगशाळेत मशिनरी व  तंत्रज्ञ असून रिएजंट उपलब्ध नाहीत त्यामुळे रुग्णांना २ दिवस रिपोर्टसाठी थांबावे लागते. शवविच्छेदन रूम मोडकळीस आल्याने शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धोकादायक स्थिती निर्माण झालेली आहे. अॅम्ब्युलन्सीची शेडवरील पत्रे तुटल्याने १०२ अॅम्बुलन्सला देखील धोका निर्माण झाला आहे. अॅम्बुलन्सला ड्रायव्हर सुद्धा उपलब्ध नाही. रुग्णालयाची सोलार सिस्टीम नवीन असून सुरू केलेली नाही. रूग्णालयाच्या आवारात जीर्ण झालेले वृक्ष असून त्यामुळे रुग्णालयाच्या आवारातील केबीन, पी. एम. रूम यांना धोका आहे. रुग्णालयाच्या रस्त्याच्या पलिकडे विहीर असून ती स्वच्छ करून पंपशेड मोडलेली आहे ती नवीन बांधून त्याचे पाणी रुग्णालयाच्या वापरासाठी देण्यात यावे.

तसेच एक्सरे टेक्निशियन उपलब्ध नाही. एक्सरे मशीन ही जुन्या इमारतीमध्ये असून रुग्णाची होणारी परवड लक्षात घेत मशनरी नवीन इमारतीत स्थलांतरीत करण्यात यावी. रुग्णालयामध्ये पुरेशा प्रमाणात औषधे उपलब्ध करून दयावीत. तज्ञ डॉक्टर्स आठवडयातून १ ते २ दिवस मिळावेत. वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय हे ५० बेड असणारे रुग्णालय असून सदर रुग्णालयाची साफसफाई वेळेत होत नाही ३ पुरेसे कर्मचारी व सफाई कामगार नसल्यामुळे व सदर सफाई कामागारांना त्याच्या कॉन्ट्रक्टर कडून पुरेसे सफाई सामान मिळत नसल्याने रुग्णालयाची सफाई होत नाही. रुग्णालयामध्ये वैदयकीय अधिकारी वेळेवर रुग्णालयामध्ये येत नाहीत. आदी समस्यांवर लक्ष वेधले तर येत्या ८ दिवसांत या सर्व मांडलेल्या मुद्दयांची पुर्तता न झाल्यास दिनांक ८ सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात इशारा दिला आहे.