
राजापूर : तालुक्यातील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल सोलगाव तालुका राजापूर, जि. रत्नागिरी.या विद्यालयात आज सोमवार दिनांक 21 जुलै 2025 रोजी रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
पावसाळ्याच्या दिवसात कोकणामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेला, नैसर्गिकरीत्या रुजलेला व शरीरासाठी पौष्टिक असलेला रानमेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विविध भाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. याचे महत्त्व जाणून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राजापूर तालुका रास्तदर धान्य दुकान संघटना अध्यक्ष महेश नकाशे व दैनिक सकाळचे राजापूर तालुका प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र बाईत उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये रानभाजी पासून बनविलेल्या विविध रेसिपींच्या दालनाचे प्रदर्शन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करून विद्येची देवता सरस्वती व रत्नागिरी जिल्ह्याचे माजी खासदार,सहकार व शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदरावजी निकम साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर इयत्ता दहावीतील विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत गायले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दिनेश चौगुले सर यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री चौगुले सर यांनी केले.
यानंतर रानभाजी प्रदर्शन व त्यापासून बनवलेल्या विविध रेसिपींच्या दालनाचे उद्घाटन* उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यामध्ये शाळेतील 35 विद्यार्थ्यांनी बनविलेल्या भारंगी फुलांची भाजी, ओव्याच्या पानाच्या वड्या, अळूचे फदफते,काटलाची वडी, गोलाच्या पानाची वडी, ओव्याच्या पानांची भजी, शेवग्याची भजी, टाकळ्याचा पराठा, काठेमाठ भजी, अळूवड्या ,फांदीच्या पानांची भाजी,मटारू पानांची वडी, सुरंगची वडी, कुरडूची भाजी, टाकळ्याची वडी, शेवग्याची भाजी, कुरडूची भाजी ,फांदीचे धपाटे, गोवलाची वडी,वांवगडची भजी, मोरभाजीची वडी, अखुराची भाजी, मायाळूची भाजी, फांदीच्या पानांची भजी,अळंबीची भाजी, घोळीचे पकोडे इत्यादी रेसिपींचे प्रदर्शन व आयोजन करण्यात आले होते.
या रानभाजी रेसिपी प्रदर्शनातून सर्वोत्कृष्ट रानभाज्या म्हणून मान्यवरांच्या हस्ते प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले. प्रथम क्रमांक वेदिका व कुणाल विजय बाणे यांच्या सुरणाच्या वड्या, द्वितीय क्रमांक श्रावणी मोहन मांडवकर हिच्या वांवगडच्या पानांची भजी आणि तृतीय क्रमांक कुमार हर्षल विनायक शेलार याच्या मायाळूची भाजी व कुमार तुषार सुरेश जोशी याच्या आळंबीची भाजी यांना देण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर उपस्थित मान्यवर श्री. महेशजी नकाशे यांनी मनोगत व्यक्त करताना "कोकणचा हा समृद्ध रानमेवा सध्या लोप होत चालला असून त्याची जपणूक पोषक आहार म्हणून आपण केली पाहिजे व पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली पाहिजे असे प्रतिपादन केले.तसेच सर्व विद्यार्थ्यांनी बनविलेल्या रेसिपी व गोळा केलेल्या रानभाज्या अतिशय उत्कृष्ट व उत्तम होत्या. असे विद्यार्थ्यांना सांगितले." कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक उमेश गमरे यांनी केले.