
कणकवली : कणकवली डॉ. नागवेकर यांच्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झालेली मृत कस्तुरी पाताडे हिचा कोल्हापूर येथे झालेला दुदैवी मृत्यू व त्यानंतर डॉक्टर नागवेकर हॉस्पिटलची जमावाकडून झालेली तोडफोड या दोन्ही घटना दुदैवी आहेत. जर जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे ही सक्षम झाली पाहिजेत. शासकीय आरोग्य व्यवस्था सुस्थिती असती तर छोट्याशा शस्त्रक्रियेसाठी मृत कस्तुरीला खाजगी रुग्णालयात जाण्याचा प्रश्नच आला नसता, परंतु या पुढील काळात तरी सर्वानी पुढाकार घेवून जिल्ह्यातील शासकीय आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी काम करूयात. या आरोग्य व्यवस्थेच्या प्रश्नी 20 डिसेंबरला पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेवून चर्चा करण्याची भूमिका मांडण्यात आली.
गोपुरी आश्रम येथील सभागृहात जिल्ह्यात निर्माण झालेल्या आरोग्य व्यवस्थेच्या प्रश्नी बैठक पार पडली. या बैठकीच्या प्रारंभी मृत कस्तुरी चंद्रकांत पाताडे हिच्या दुदैवी मृत्यूबद्दल श्रध्दांजली वाहण्यात आली. या बैठकीला ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबळेकर , गोपुरीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर , सचिव विनायक मेस्त्री , नंदन वेंगुर्लेकर, विजय सावंत , संदीप सावंत , विनायक सापळे , मधुकर नलावडे , पत्रकार भगवान लोके , उमेश बुचडे , प्रमोद जोशी , विनायक नाईक , प्रसाद सावंत , यशोधर खाडये , संजय गोरुले, नितीन तळेकर , शंकर धुरी , संदीप शिंदे , राजेंद्र वर्णे , किशोर सोगम , सुप्रिया पाटील, गीतांजली कामत , राहुल कदम , नामानंद मोडक , धनंजय सावंत , दुर्गाप्रसाद काजरेकर , परेश परुळेकर , संतोष माळवडे , दीपक कदम , विश्वजीत रासम , रमाकांत पावस्कर आदींसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अशोक करंबळेकर म्हणाले , कणकवलीत घडलेल्या घटना या दुदैवी आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना किरकोळ आजारासाठी खाजगी रुग्णालया गेल्यानंतर मिळणारा उपचार , वागणूक , सेवा ही जरी कमी दर्जाची असली तरी खर्चीक आहे. सार्वजनिक रुग्णालये ही पूर्ण क्षमतेने सक्षम नसल्याने रुग्णांचा नाईलाज होतो. त्यामुळे रुग्णांना खाजगी रुग्णालयात जाण्याची वेळ येते. आरोग्य व्यवस्थेचा गोंधळ झालेला आहे.एखादी अप्रिय घटना घडल्यामुळे प्रक्षोप होतो. त्याची बदनामी सर्वत्र होते. त्यामुळे नागरिकांच्या भावना काय आहेत ? या मांडण्यासाठी आम्ही पालकमंत्र्यांची भेट घेणार आहोत.
बाळू मेस्त्री म्हणाले ,कालपर्यंत तसेच वाटत होते . कणकवलीत तोडफोड संस्कृती आहे. परंतु सुरुवात कुठुन झाली त्याचा व्हिडीओ आज समोर आला आहे. जमावाला चिथावणी कोणी दिली. संबंधित 2 डॉक्टरांवर गुन्हे दाखल झाले असताना महिला म्हणतात की, मी शस्त्रक्रिया केली. मी तिथे होतो रुग्णांना बाहेर काढण्यासाठी ... चप्पल दाखवल्यानंतर उद्रेक झालेला आहे. तो रुग्ण सकाळी आला तो सांगत होता की, ती गाठ दुखत नाही . उद्या माझी परिक्षा आहे. तरीही घाईगडबडीने शस्त्रक्रिया केली गेली. त्यात तिचा मृत्यू झाला. त्यामुळे हा लढा सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी राहिल. त्यासाठी साथी ही संस्था सर्वत्र काम करते. त्यांना सोबत घेवून आपण काम करुयात , असे आवाहन त्यांनी केले.
नंदन वेंगुर्लेकर म्हणाले, आपण स्वतः रुग्णालयात जाऊन आपल्याला काय त्रुटी जाणवतात ते जाणून घ्यावेत. जिल्ह्यातील समस्या घेवून आरोग्य मंत्री व संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा केला पाहिजे.
गोपुरीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर म्हणाले , कर्ज काढून , जमीन विक्री करुन उपचार रुग्णांना करावे लागतात, ही आपल्या जिल्ह्याची परिस्थिती आहे. लोकांची मानसिकता थोडी बदलली पाहिजे . शासकीय रुग्णालयांमध्ये चांगली सेवा उपलब्ध होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करुयात .
व्हि . के. सावंत म्हणाले , या घडलेल्या घटनेमुळे कणकवलीकर बदनाम झालेले आहेत. घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. जो कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. धनदांडग्यांच्या विरुध्द हि सर्वसामान्य यंत्रणा पुरु शकत नाही. त्यामुळे अन्याय व अत्याचाराविरुध्द कोण उभे राहणार नाहीत.
संजय गोरुले म्हणाले , जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आमच्या लहानपणापासून सुधारलेली दिसत नाही. आजही आम्हाला गोवा , कोल्हापूरच्या हॉस्पिटलवर अवलंबून राहावे लागत आहे. गोव्याच्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मिळणारी वागणूक अत्यंत वाईट असते. आपली आरोग्य व्यवस्थआ सक्षम झाली पाहिजे. त्या दृष्टीने प्रयत्न करुया. व्यतिरिक्त सामाजिक कार्यकर्त्यांनी आपली मते मांडत सुचना मांडल्या.










