
सावंतवाडी : आंबोली घाटातील 'नानापाणी' परिसरात पायी बैल घेऊन जाणाऱ्या एका शेतकऱ्याला आणि त्याच्या साथीदाराला अडवून तिघा अज्ञात इसमांनी लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी तिघा संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जानू धोंडू फाले (वय २५, रा. आंबेगाव-म्हारकाटेवाडी) हे आपल्या मालकीचे दोन बैल घेऊन १६ डिसेंबर रोजी सायंकाळी आपल्या चौकुळ येथे राहणाऱ्या मेहुण्याकडे देण्यासाठी पायी निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांचे शेजारी पांडुरंग बाबू शेळके हे होते. दाणोली येथे त्यांचा मेहुणा बाबू झोरे व विठू कोकरे हे त्यांच्या सोबत आले. त्यानंतर ते चौघेही आंबोलीच्या दिशेने निघाले. दरम्यान, रात्री ११.३० च्या सुमारास ते आंबोली घाटातील नानापाणी येथे पोहोचले असता, एका चारचाकी गाडीतून आलेल्या तीन व्यक्तींनी त्यांना थांबवले. "हे बैल घेऊन कुठे जात आहात? " अशी विचारणा करत, संशयितांनी फिर्यादींचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी संशयितांनी झाडाच्या वेली आणि काठ्यांचा वापर करून चौघांनाही जखमी केले. मारहाणीत फिर्यादी जानू फाले हे बेशुद्ध पडले होते. इतकेच नव्हे तर, संशयित आरोपींनी त्यांच्याकडील दोन मोबाईल फोन आणि ग्रामपंचायतीने दिलेला बैल वाहतुकीचा परवानाही बळजबरीने हिसकावून घेतला. "याबाबत पोलिसांना सांगितल्यास ठार मारू," अशी धमकी देऊन आरोपींनी तेथून पळ काढला.
या घटनेनंतर घाबरलेल्या फिर्यादींनी सुरुवातीला तक्रार दिली नव्हती. मात्र, १८ डिसेंबर रोजी या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यांनंतर फिर्यादीचा पुतण्या धोंडी फाले याने त्यांना हा व्हिडिओ दाखवल्यानंतर, आपली बदनामी झाल्याने आणि मानसिक धक्का बसल्याने जानू फाले यांनी १९ डिसेंबर रोजी सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी कृष्णा वीरबसप्पा धुळपण्णावर (रा. कोकण कॉलनी, सावंतवाडी), रामचंद्र प्रवीण परब (रा. सावंतवाडी) आणि अथर्व (पूर्ण नाव माहित नाही, रा. सावंतवाडी) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३५६(२), ३५६(३), ११८(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रामदास लाडू जाधव करत आहेत.










