२१ डिसेंबरला मतमोजणी

मालवणात निवडणूक - पोलीस यंत्रणा सज्ज
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: December 19, 2025 20:45 PM
views 23  views

मालवण : मालवण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक मतमोजणीची प्रक्रिया २१ डिसेंबर रोजी होत आहे. यासाठी निवडणूक व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. नगरपरिषदेत सकाळी दहा वाजता मतमोजणीच्या प्रक्रियेस सुरवात होणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रतीक थोरात, पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी दिली. 

मतमोजणी प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे. २१ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत स्ट्रॉंगरूम उघडण्यात येणार आहे. त्यानंतर दहा वाजता मतमोजणीला सुरवात करण्यात येणार आहे. मतमोजणीला येणाऱ्या उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी यांनी ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे. प्रभागनिहाय मतमोजणी होणार आहे. यात प्रभाग एक ते पाच प्रभागाची मतमोजणी होईल. त्यात प्रत्येक टेबलवर पहिल्या फेरीत प्रभागनिहाय मतदान केंद्राचे मतदान यंत्र असेल तर दुसऱ्या फेरीत दुसरे मतदान यंत्र असेल. दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर पाच प्रभागातील विजयी उमेदवार जाहीर केले जाणार आहेत. यात पहिल्या दोन फेऱ्यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचे मतदानही जाहीर केले जाणार आहे. पहिले पाच प्रभाग झाल्यानंतर प्रभाग सहा ते दहा या प्रभागाची दोन फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल. यातील विजयी उमेदवार व नगराध्यक्ष पदाच्या विजयी उमेदवार जाहीर केले जाणार आहेत. नगरसेवक पदाच्या उमेदवारासह त्यांचा एक प्रतिनिधी प्रत्येक टेबलवर असेल.  तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचे प्रत्येक टेबलवर एक असे पाच प्रतिनिधी असतील. मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी २५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती श्री. पाटील, श्री. थोरात यांनी दिली. 

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर फोवकांडा पिंपळ भागात भाजप, नाट्यगृह लगतच्या भागात शिवसेना तर बांगीवाडा भागात ठाकरे शिवसेनेसाठी थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भरड ते फोवकांडा पिंपळ तसेच बांगीवाडा ते हॉटेल कोणार्क हा मार्ग वाहतुकीसाठी दुपारी एक वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

मतमोजणी केंद्रावर ६ पोलीस अधिकारी, २० अंमलदार, १४ गृहरक्षक दलाचे जवान, मतदान केंद्राच्या बाहेर ३ अधिकारी, १७ अंमलदार, १७ गृहरक्षक दलाचे जवान, गस्तीसाठी ४ पोलीस अधिकारी, ४ अंमलदार, तपास पथकात १ अधिकारी, ४ अंमलदार यांच्यासह स्ट्रॉंगरूम व अन्य जागांवर १ अधिकारी, १४ अंमलदार, ८ गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय शहरात विशेष कृतीदलाचे १५ जवान, दंगा काबू पथकाचे ३० जवान, राज्य राखीव पोलीस दलाचे ३० जवान बंदोबस्तासाठी तैनात असतील. 

भरड नाका ते फोवकांडा पिंपळ तसेच बांगीवाडा ते हॉटेल कोणार्क हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे हडी कोळंब मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी कोळंब नाका सागरी महामार्ग वरून देऊळवाडा नाका मार्गे बाजारपेठ, बांगीवाडा येथे जाणाऱ्या वाहनांसाठी भरड नाका लीलाधर हडकर मार्ग बांगीवाडा मार्ग, मालवण बाजारपेठ व जेटी मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी राजकोट जाणारा रस्ता, कचेरी रोड मार्ग, माघी गणेश मंदिर मार्ग असा पर्यायी मार्गाचा वापर करायचा आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी दिली.