
कुडाळ : कासार्डे येथील १९ वर्षीय युवती कु. कस्तुरी पाताडे हिचा कणकवली येथील नागवेकर हॉस्पिटलमध्ये झालेल्या कथित शस्त्रक्रियेमुळे मृत्यू झाला. या घटनेनंतर निर्माण झालेला जनक्षोभ आणि त्यानंतर डॉक्टरांनी पुकारलेला संप या पार्श्वभूमीवर, आता कुडाळमधील सजग नागरिक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणावर विचारविनिमय करण्यासाठी आणि कस्तुरीला श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवार, २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता कुडाळमध्ये एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कणकवली येथील डॉ. नागवेकर हॉस्पिटलमध्ये कस्तुरी पाताडे हिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी नातेवाईकांना उद्धट वागणूक दिल्याचाही दावा केला जात आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी हॉस्पिटलची तोडफोड केली होती, ज्याचा निषेध म्हणून जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी ओपीडी (OPD) बंद ठेवून संप पुकारला होता. डॉक्टरांच्या या भूमिकेनंतर आता सामान्य जनता संघटित होत असून, 'आज कस्तुरीवर वेळ आली, उद्या ती आपल्यावर येऊ शकते' या भावनेतून कुडाळमधील नागरिक एकत्र येत आहेत.
दिनांक: रविवार, २१ डिसेंबर २०२५
वेळ: सायंकाळी ४:०० वाजता
स्थळ: श्री गणपती मंदिर (कोर्टाच्या बाजूला), कुडाळ
जनतेच्या हक्कासाठी सर्वांनी संवेदनशील राहून एकत्र येणे गरजेचे आहे," असे आवाहन कुडाळ शहरातील जागरूक नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे. या बैठकीत कस्तुरी पाताडे हिला श्रद्धांजली अर्पण करून पुढील आंदोलनाची किंवा कायदेशीर लढ्याची दिशा ठरवली जाण्याची शक्यता आहे.










