पदराशी उच्च शिक्षण पण....!

मदतीला धावली 'सामाजिक बांधिलकी'
Edited by:
Published on: December 16, 2023 12:28 PM
views 152  views

सावंतवाडी : नोकरीच्या शोधात नाशिक येथील कुटुंबान गोवा व कर्नाटक ही दोन्ही राज्य पालथी घातली. पदराशी उच्च शिक्षण असताना देखील नोकरी न मिळाल्यान व गाठीशी असलेले पैसे संपल्यान त्यांना रस्त्यावर जीवन जगाव लागल. दरम्यान, गोव्यावरून अनवाणी चालत सावंतवाडीच्या दिशेने ते आले असता सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते त्यांच्या मदतीला धावून आले. 


मुलांच्या नोकरीच्या निमित्ताने नाशिक पंचवटी जुना आडगाव नाका या शहरातून दोन्ही मुलांना सोबत घेऊन नंदा साळी या महिलेने मुलांच्या नोकरीच्या शोधात गोवा व कर्नाटक ही दोन्ही राज्य पालथी घातली. हे कुटुंब गेला एक महिना कर्नाटक व गोवा राज्यात नोकरीसाठी भटकंती करत होते. नोकरी काही मिळाली नाही, खर्चाला आणलेले पैसेही संपले. कित्येक रात्री त्यांनी उपाशी रस्त्यावर झोपून काढले. पोटाला अन्न नाही, हातात पैसे नाही. कोणी मदत करायला तयार नाही. अखेर गोव्यावरून अनवाणी ते सावंतवाडीच्या दिशेने चालत राहिले. पायात चप्पल नसल्याने तळ पायांची चामडी जाऊन तिघांचेही पाय सुजले होते. तर अंगावरचे कपडे पूर्णपणे जीर्ण व दुर्गंधीयुक्त झाले होते. सर्व परिस्थितीला कंटाळून त्यांची मानसिक स्थिती ढासळली होती. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काल रात्री नऊ वाजता सावंतवाडी मळगाव गाठले. ते तिघही भुकेने व्याकुळ झाले होते. त्यांची अशी दयनीय अवस्था पाहून मळगावचे ग्रामस्थ उपसरपंच हनुमंत पेडणेकर, पत्रकार सचिन रेडकर व श्री. जोशी यांनी त्यांना पोटभर जेवण दिले.

दरम्यान, सामाजिक बांधिलकीचे कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, रवी जाधव व समीरा खलील यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर संजय पेडणेकर यांनी तत्काळ पोलीस प्रसाद कदम यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी त्या तिघांची सर्व माहिती घेतली असता या मुलांची आई अंगणवाडीची शिक्षिका होती. तर मुलगी बी. कॉम, एम. ए. मास्क कम्युनिकेशन अँड जर्नालिझम, एम.बी.ए. इन पब्लिक रिलेशन डिस्टन्स लर्निंग तसेच ती ऍडव्हर्टायझिंग क्षेत्रामध्ये काम करायची. तर भाऊ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनियर झालेला आहे. एवढं शिक्षण घेऊन सुद्धा मनासारखी नोकरी नसल्यामुळे कोणाच्यातरी सल्ल्यावरून त्यांनी नाशिक शहर सोडण्याचा निर्णय घेतला. तोच निर्णय त्यांना आज रस्त्यावर घेऊन आला. या सर्व माहितीचा आढावा घेऊन सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी त्या तिघांनाही त्यांच्या मूळ घरी नाशिक येथे परत पाठविण्याचा निर्णय घेतला. तर पोलीस प्रसाद कदम यांनी त्यांना नाशिकपर्यंत जाण्याकरिता ट्रेनच्या तिकिटांचे पैसे दिले. सावंतवाडी येथून कणकवली येथे मंगला एक्सप्रेससाठी रेल्वे स्टेशनला जाण्याकरिता स्व खर्चाने रिक्षा सुद्धा उपलब्ध करून दिली. सामाजिक बांधिलकीच्या या कार्यांच सर्वत्र कौतुक केलं जात आहे.