..तर कालव्यात बसून आंदोलन करणार : जावेद खतीब

Edited by: संदीप देसाई
Published on: April 22, 2024 13:48 PM
views 81  views

बांदा : वाढत्या पाण्याच्या मागणीनुसार मोपा (गोवा) येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळसाठी तिलारी शाखा कालव्यातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने बांदा शाखा कालव्यात सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. याचा परिणाम बांदा शहर ग्रामपंचायतच्या नळपाणी योजनेवर झाला आहे. शहरातील खासगी विहिरीच्या पाणी पातळीत देखील मोठी घट झाल्याने परिसरात पाण्याचे दुर्भीक्ष जाणवत आहे. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी उपसरपंच जावेद खतीब यांनी कालव्याची पाहणी करत तिलारी कालवा विभागाने तात्काळ पाण्याचा विसर्ग न वाढविल्यास कालव्यात बसून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

तिलारीच्या बांदा शाखा कालव्यात डिसेम्बर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नेतर्डे येथून पाणी सोडण्यात आले होते. यावर्षी पाणी लवकर सोडण्यात आल्याने कालव्याच्या ४२ किलोमीटर क्षेत्रात पाणी वेळेत पोहोचले. यामुळे पाणी जमिनीत मुरल्याने बांदा शहर व लाभ क्षेत्रातील विहिरीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली होती.

बांदा ग्रामपंचायतच्या नळपाणी योजनेला देखील याचा फायदा झाला होता. गेल्या पंधरा दिवसांपासून कालव्यात सोडण्यात आलेले पाण्याचा विसर्ग अचानक कमी करण्यात आला आहे. यामुळे स्थानिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पाण्याअभावी बांदा शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तसेच पाणी नसल्याने या परिसरातील बागायती देखील करपून गेली आहे.

नेतर्डे, डिंगणे, बांदा, इन्सुली, ओटवणे, सरमळे, निगुडे, पाडलोस, रोणापाल गावातील शेतकरी व स्थानिक तिलारी शाखा कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. अनेक गावात शेतकरी या पाण्यावरच उन्हाळी शेती करतात. मोठ्या प्रमाणात नगदी पिके घेतात. मात्र कालव्यातील पाण्याचा विसर्ग कमी केल्याने उन्हाळी शेती व बागायती संकटात आली आहे.

कालव्यात बसून आंदोलन करणार

दरवर्षी कालव्यातील पाणी हे मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुरु ठेवण्यात येते. पाऊस सुरु झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाला कल्पना देऊन पाणी बंद करण्यात येते. मात्र तिलारी कालवा विभागाने मोपा विमानतळच्या नावाखाली येथील पाणी बंद केल्यास स्थानिकांसह कालव्यात बसून आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी ही कालवा विभागाची राहील.