
कोल्हापूर : कॅन्सर रुग्णांचे हसरे चेहरे हीच कोल्हापूर कॅन्सर सेंटरची खरी सेवा असल्याचा आशावाद आज व्यक्त झाला. जीवनानंद कार्यक्रमाच्या निमित्ताने कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांनी मनमोकळा संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या. निमित्त होते कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वर्धापन दिनाचे.
कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त जीवनानंद या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कॅन्सर रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्याच्या दृष्टीने कॅन्सरमधून बरे झालेल्या रुग्णांचा मेळावा कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या प्रांगणात झाला.
कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सूरज पवार, डॉ. रेश्मा पवार, डॉ. योगेश अनाप, डॉ. पराग वाटवे यांनी वर्धापन दिनानिमित्त जीवनानंद कार्यक्रमाची कल्पना स्पष्ट करून रुग्ण, नातेवाईक, हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांबरोबर आनंद लुटला.
डॉ. सूरज पवार म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा येथील ४७ हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार येथे झाले आहेत. इतकेच नाही तर अत्याधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञ डॉक्टर्स, किंबहुना मुंबईपेक्षा प्रगत सुविधा असणारे कोल्हापूर कॅन्सर सेंटर हे कोल्हापूरला लाभलेले वरदान आहे.
कॅन्सर मुक्तीच्या दोन दशकांच्या अविरत प्रयासामध्ये रेडिएशन थेरपीमधील सर्वौत्तम तंत्रज्ञानाचा वापर करून, अत्याधुनिक लॅप्रोस्कोपिक व रोबोटिक शस्त्रक्रिया करून २७ हजार रुग्णांवर कॅन्सर शस्त्रक्रिया, २२ हजार रुग्णांची केमोथेरपी व १४ हजार रुग्णांवर रेडिएशन थेरपी करण्यात आली आहे.
१५ हून अधिक रुग्णांनी उत्स्फूर्त मनोगते व्यक्त केली. याचबरोबर यावर्षीचा एम्पॉली ऑफ द इयर २०२४-२५ हा पुरस्कार कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या नर्सिंग विभागातील रूपाली साळुंखे यांना देण्यात आला. यावेळी डॉ. संदीप पाटील, कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे सर्व डॉक्टर्स, कर्मचारी, रुग्ण व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.