विद्यामंदिर कनेडीत आता कौशल्य विकास अभ्यासक्रम

परिपूर्ण शिक्षणावर संस्थेचा भर: सतीश सावंत
Edited by: साहिल बागवे
Published on: July 06, 2024 07:00 AM
views 192  views

कणकवली : केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर पर्यावरण पूरक, कौशल्य विकास साधणारे आणि सर्वांगीण विकासाचे  परिपूर्ण शिक्षण सातत्याने देत असल्यानेच ९०० पेक्षा अधिक विद्यार्थी कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, कनिष्ठ महाविद्यालय आणि बालमंदिर येथे शिक्षण घेत आहेत. गुणवत्तापुर्ण निकाल व अन्य उपक्रम यामुळे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये  जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावण्यात आम्ही यशस्वी झालो. संस्थेचे ७० वर्षात पदार्पण होत असताना नव्याने कौशल्य विकास पूर्ण अभ्यासक्रम आम्ही सुरू करत आहोत अशी माहिती कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेतील दिली.

कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या ७० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून खास. अरविंद सावंत यांच्या हस्ते नव्या कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे उद्घाटन होणार असून रविवार ७ जुलैला सकाळी १० वाजता संस्थेचा वर्धापन साजरा होत असल्याची माहिती सतीश सावंत यांनी यावेळी दिली. 

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे आयोजित संस्थेच्या पत्रकार परिषदेत संस्था अध्यक्ष सतीश सावंत बोलत होते.यावेळी शालेय समितीचे चेअरमन आर.एच. सावंत, संस्थेचे सनदी लेखापाल तुकाराम रासम, अंतर्गत हिशेब तपासणी रवींद्र सावंत, शालेय समितीचे सदस्य बावतीस घोन्साल्विस,  प्राचार्य सुमंत दळवी, तुषार सावंत, पर्यवेक्षक बयाजी बुराण आदी मान्यवर उपस्थित होते.

 कनेडी शिक्षण संस्थेची स्थापना ४ जुलै १९५४ रोजी झाली. त्यानंतर संस्थेच्या एकूण वाटचालीत प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवला. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये संस्थेने विविध उपक्रम सुरू केले. हे उपक्रम शासनाच्या विविध निकषांमध्ये बसत असल्यामुळे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाचे सर्व निकष आम्ही पूर्ण केले. त्यामुळे तालुकास्तरावर ३ लाख आणि जिल्हास्तरावर ११ लाखाचे पारितोषिक या संस्थेला मिळाले आहे. कनेडी दशक्रोशीमध्ये आणि कणकवली तालुका तसेच आजूबाजूच्या परिसरातून अनेक विद्यार्थी येथे प्रवेश घेत आहेत. याचे कारण दहावी आणि बारावीचा १०० टक्के निकाल देत असताना राज्यस्तरावर आणि केंद्रस्तरावरच्या प्रवेश पात्रता परीक्षांमध्ये ही विद्यार्थी यशस्वी होत आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असताना नीती आयोगाच्या अटल  टिंकरींग ही अद्यावत अशी लॅब संस्थेने उभारली आहे. अभियांत्रिक शिक्षणापूर्वीचे प्रशिक्षण येथे दिले जाते. याचबरोबर विद्यार्थ्यांना बचतीची सवय व्हावी म्हणून विद्यार्थी बँक हा  उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थी वस्तू भांडार हे नोंदणीकृत आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये पर्यावरणाचे धडे मिळावेत म्हणून शेती आणि शेतीपूरक व्यवसाय याचे प्रशिक्षण दिले जाते. म्हणूनच पुणे येथील एक संस्था आणि कुडाळच्या भगीरथ संस्थेच्या माध्यमातून कौशल्य विकास हा नवा अभ्यासक्रम सुरू करत आहोत. या अभ्यासक्रमामध्ये आठवी आणि नववीमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला शेती शेतीपूरक व्यवसाय प्रक्रिया उद्योग, इलेक्ट्रॉनिक, प्लंबिंग आणि फॅब्रिकेशन अशा विविध शिक्षणाचे ज्ञान दिले जाणार आहे. यासाठी संस्थेने पदरमोड करून विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा हा उपक्रम सुरू केला आहे. दहावी, बारावीनंतर स्वतःच्या पायावर विद्यार्थी उभे राहावे म्हणून हा उपक्रम सुरू केला. खऱ्या अर्थाने २००४ मध्ये संस्थेने विज्ञान शाखा सुरू केली. यामुळे आज या परिसरातील अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअरिंग, नर्सिंग अशा विविध क्षेत्रांमध्ये जाऊन यश मिळवत आहेत. शिक्षणातून समृद्धी हा संस्थेचा ध्यास आहे. त्यामुळे गेल्या ७० वर्षात विविध स्तरावर आर्थिक मदत उभारून, संस्थेच्या सर्व घटकांकडून सांघिक काम होत असल्याने हा यशाचा वाटा सर्वांचा आहे. या शाळेचा विद्यार्थी हा परिपूर्ण व्हावा, या हेतूने विविध क्रीडा क्षेत्रांमध्ये ही सांघिक काम शिक्षकानी केले आहे. म्हणूनच कॅरम स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर विजय मिळवलेली संस्थेची विद्यार्थी दिशा चव्हाण ही राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करत आहे. अलीकडेच केंद्र शासनाच्या खेलो इंडिया या उपक्रमा अंतर्गत राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी गोवा विभागामध्ये एका विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. गुणवत्तापूर्ण खेळाडू निर्माण करणे हा आमचा ध्यास या निमित्ताने पूर्ण झाला आहे. 

श्री. सावंत म्हणाले, शालेय जीवनानंतर विद्यार्थी सक्षम बनला पाहिजे म्हणून आतापासूनच कमवा आणि शिका हा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी अकरावी आणि बारावी मध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी शिवणकला हा विषय देण्यात आला आहे. यासाठी शाळेमध्ये सहा शिलाई मशीन उपलब्ध असून यातून कागदाच्या पिशव्या तयार करणे व विविध कापड तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या शाळेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला शासकीय स्तरावरील कोणत्याही परीक्षेला बसण्यासाठी तयार केले जाते. एमपीएससी, यूपीएससी आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आमचे विद्यार्थी यश मिळवत आहे. तसे प्रशिक्षण येथे दिले जाते.असे सतीश सावंत म्हणाले. प्राचार्य सुमंत दळवी यांनी आभार मानले.