
मालवण : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कणकवली येथील नुतन विश्राम गृहाला गळती झाल्याची पोलखोल आमदार वैभव नाईक यांनी केल्यानंतर आता मालवण येथील सा. बा. विभागाच्या सिंधुरत्न (आरसे महाल) विश्रामगृहाला देखील गळती लागल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. ४ कोटी रु खर्च करून या विश्रामगृहाचे नूतनीकरण करण्यात आले. मात्र पहिल्या पावसात हे काम निकृष्ट झाल्याचे सिद्ध झाले आहे. विश्रामगृहाच्या छप्पराचा काही भाग तुटून पावसाच्या पाण्याची धार लागली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री आता काय कारवाई करणार असा सवाल आमदार नाईक यांनी केला आहे.
आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे, विश्रामगृहाच्या भितींमध्ये पाणी पाझरून त्या ओल्या झाल्या आहेत. स्लॅब मधून पाण्याचे थेंब पडत आहेत त्याठिकाणी बकेट ठेवण्यात आले आहे. फर्नीचरला बुरशी पकडली आहे. यावरून विश्राम गृहाच्या कामात शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर आणि सा. बा. अधिकाऱ्यांवर सावर्जनिक बांधकाम मंत्री काय कारवाई करणार? असा सवाल आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.