
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयासाठी जमिनी देऊनही पदरी निराशाच पडलेल्या रानबांबुळी ग्रामस्थांनी आता प्रस्तावित सिंधुदुर्ग नगरी नगरपंचायत निर्मितीला कडाडून विरोध केला आहे. "शासनाने विकास करण्याऐवजी आमच्या जमिनी कवडीमोल भावाने घेऊन बिल्डरांचे हित साधले आहे," असा गंभीर आरोप करत रानबांबुळी ग्रामसभेने नगरपंचायत होण्यास १००% विरोध दर्शवला आहे.
जमिनी गेल्या, पण न्याय मिळाला नाही
रानबांबुळीचे सरपंच परशुराम परब यांनी ग्रामस्थांच्या वतीने संताप व्यक्त केला. १९८९ मध्ये जिल्हा मुख्यालयाची अधिसूचना जाहीर झाली, तेव्हा रानबांबुळीतील शेतकऱ्यांच्या जमिनी केवळ १२० रुपयांत खरेदी करण्यात आल्या. दाभाची वाडी धरण प्रकल्पात ६०% जागा रानबांबुळीची आहे, रेल्वे स्टेशन येथे आहे, तरीही स्थानिकांना शासकीय सेवेत सामावून घेतले गेले नाही.
'भविष्यकालीन विकास' झोनचा फास
गावातील पारंपरिक शेतीच्या जमिनींवर 'भविष्यकालीन विकास' ( निवासी झोन) असे शिक्के मारण्यात आले आहेत. यामुळे स्थानिक ग्रामस्थांना स्वतःच्या जमिनीवर कोणतेही बांधकाम किंवा विकास करता येत नाही. शासनाने घेतलेल्या जमिनी आज लाखो रुपयांना विकल्या जात आहेत, मात्र मूळ मालक असलेला शेतकरी आजही आर्थिक संकटात आहे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
सरपंच परब यांनी शासनाच्या विकासकामांवरही ताशेरे ओढले. ते म्हणाले: "शासनाने बांधलेल्या इमारती आज पडायला आल्या आहेत, रस्ते खराब आहेत आणि ड्रेनेजची अवस्था बिकट आहे. यापेक्षा आमच्या ग्रामपंचायतीने गावात चांगली कामे केली आहेत. विकासाच्या नावाखाली केवळ जागा विकल्या जात असल्याने आम्ही पूर्णपणे विरोध करत आहोत."
कायदेशीर मागणी आणि आंदोलनाचा पवित्रा
ग्रामसभेत ग्रामस्थांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, कलम १२७ चा दाखला दिला. जर शासनाने १० वर्षांत संपादित जमीन उपयोगात आणली नसेल, तर ती जमीन मूळ मालकाला परत मिळावी आणि त्याचे नुकसान भरपाई (कंपनसेशन) मिळावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. हा अन्याय दूर न झाल्यास मोठ्या आंदोलनाची हाकही परशुराम परब यांनी दिली आहे.
या महत्त्वपूर्ण ग्रामसभेला सरपंच परशुराम परब, उपसरपंच अंजली कदम, बबन काका, अशोक परब (पप्पा), तंटामुक्ती अध्यक्ष भाई गावडे, पोलीस पाटील प्रकाश मुनगेकर, ग्रामसेवक मनमोहन धुरी यांच्यासह रवळनाथ परब, शुभम परब, संजय लाड, सुहास बांबुळकर, सतीश परब, सुभाष बांबुळकर, चंद्रकांत ठाकूर,विलास डोंगरे, प्रसाद गावडे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.










