शिरोडा वेळागर येथील ९ हेक्टर जमीन वगळण्याच्या ठरावाचे लेखी पत्र द्या

शेतकरी संघटनेची मागणी
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: January 08, 2026 19:58 PM
views 51  views

सिंधुदुर्गनगरी : वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा वेळागर येथील पर्यटन प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींपैकी स्थानिक शेतकऱ्यांची मागणी असलेले सुमारे ९ हेक्टर क्षेत्र संपादनातून वगळून ते कोणत्याही अटी-शर्ती न ठेवता मूळ वहिवाटदारांच्या नावे पूर्ववत करण्याचा ठराव झालेला आहे. मात्र, या ठरावाबाबतचे अधिकृत लेखी पत्र प्रशासनाकडून तातडीने देण्यात यावे, अशी मागणी शिरोडा वेळागरवाडी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र आंदुर्लेकर, हनुमंत गवंडी, जयप्रकाश चमणकर, महादेव आंदुर्लेकर, शेखर नाईक, विनोद आरोसकर आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की,

जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला होता. या बैठकीस आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश चमणकर, जिल्हाधिकारी तसेच संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी आणि टाटा समूहाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत भूमापन व उपविभाग क्रमांक २९ पैकी, ३० पैकी, ३१ संपूर्ण, ३२ संपूर्ण, ७ पैकी आणि १ पैकी असे एकूण सुमारे ९ हेक्टर क्षेत्र संपादनातून वगळण्याचा ठराव घोषित करण्यात आला असून, त्या निर्णयानुसार पुढील कार्यवाहीसाठी लेखी आदेश देणे आवश्यक आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

    या ठरावानुसार संबंधित जमीन मूळ वहिवाटदार व स्थानिक रहिवाशांच्या नावे पूर्ववत नोंद करण्यात यावी तसेच त्याबाबतचे लेखी पत्र व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आदेशांच्या प्रती उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.