आज गुलाब, उद्यापासून दंड !

रस्ता सुरक्षा अभियानात वाहतूक पोलिसांचा स्पष्ट इशारा
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: January 08, 2026 18:41 PM
views 661  views

सिंधुदुर्गनगरी : “आज प्रेमाने समजावतोय, उद्यापासून थेट कारवाई!” असा स्पष्ट इशारा देत सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस वाहतूक शाखेने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत गुरुवारी सिंधुदुर्गनगरीत विशेष जनजागृती मोहीम राबवली. पोलीस रायझिंग डे व रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना गुलाबपुष्प देत नियमांची जाणीव करून देण्यात आली.

सिंधुदुर्गनगरी शहरात सर्वत्र एकमार्गी (वन-वे) वाहतूक व्यवस्था असताना अनेक वाहनचालक उलट्या दिशेने वाहने चालवत असल्याने अपघातांच्या घटना घडत आहेत. या गंभीर बाबीची दखल थेट जिल्हा न्यायालयानेही घेतली होती. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस वाहतूक शाखेने शहरात ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. सिडको सर्कल येथून उलट्या दिशेने न्यायालयाकडे जाणारे वाहनचालक, आंबेडकर भवन सर्कल, पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात चुकीच्या मार्गाने वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना थांबवून त्यांना वाहतूक नियमांची माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे नियम मोडणारे बहुतांश वाहनचालक हे विविध शासकीय व खासगी खात्यांतील कर्मचारी असल्याचे निदर्शनास आले.

या मोहिमेत पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला, पोलीस उपनिरीक्षक संतोष साळसकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल भिसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल वेंगुर्लेकर यांच्या पथकाने सहभाग घेतला. “आज केवळ समज दिली आहे. मात्र उद्यापासून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही सूट न देता कठोर कारवाई केली जाईल,” असा ठाम इशारा पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला यांनी दिला.

शहरात तसेच इतर रस्त्यांवर ‘नो पार्किंग’, ‘वन-वे’ आदी वाहतूक फलक स्पष्टपणे लावलेले असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. प्रत्येक रस्ता चिन्हांच्या माध्यमातून वाहनचालकांशी संवाद साधत असतो. त्याचे पालन करणे आवश्यक आहे. पालकांनी आपल्या वाहन चालवणाऱ्या मुलांना वाढदिवसाला हेल्मेट भेट म्हणून द्यावे, जेणेकरून अपघातात कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचेल, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.