
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या २०२६ च्या निवडणुकांचे प्रचार अवधी कमी असून, राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर वेताळ–बांबर्डे मतदारसंघाचे महायुतीचे जिल्हा परिषद उमेदवार नागेश आइर तसेच पंचायत समिती उमेदवार अश्विनी सावंत व श्रावणी तेरसे यांच्या प्रचारार्थ आज हिर्लोक येथे उत्स्फूर्त बैठक पार पडली.
या बैठकीला कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी विशेष उपस्थिती लावून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य फुंकले. यावेळी बोलताना त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. विकासाच्या मुद्द्यावर आणि स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महायुती कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
हिर्लोक येथील या बैठकीत ग्रामस्थांनी आपल्या विकासात्मक अपेक्षा मांडल्या. बैठकीदरम्यान प्रामुख्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुथ पातळीवरील नियोजन आणि जनसंपर्क वाढवण्यावर भर देण्यात येणार असल्याचे ठरवले.
मान्यवरांची उपस्थिती
या सभेला जिल्हयातील आणि तालुक्यातील महायुतीचे दिग्गज नेते उपस्थित होते. यामध्ये काका कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी, निष्ठावंत कार्यकर्ते आणि हिर्लॉक गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांचा वाढता प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता, वेताळ-बांबर्डे मतदारसंघात महायुतीचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत आहे. "जनतेचा आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांची मेहनत यामुळे आमचा विजय निश्चित आहे," असा विश्वास उमेदवार नागेश आइर यांनी यावेळी व्यक्त केला.










