जिल्ह्यात फक्त नारायण राणे नावाची शक्ती !

रविंद्र चव्हाणांच्या नावानं काही गोष्टी खपवल्या जातात : पालकमंत्री नितेश राणेंच विधान
Edited by: विनायाक गांवस
Published on: February 04, 2026 21:36 PM
views 127  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त एकच शक्ती आहे. ती म्हणजे नारायण राणे नावाची शक्ती इतर कुठली शक्ती इथे नाही असं विधान पालकमंत्री नितेश राणे यांनी केलं. तसेच प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण दिवसरात्र पक्षवाढीसाठी मेहनत करत आहेत. मात्र, त्यांच्या नावानं काही गोष्टी खपवल्या जातात. त्यांना याची कल्पनाही नसते. कुणी वातावरण खराब केलं तर गाठ नितेश राणेशी आहे हे लक्षात ठेवा असा इशारा पालकमंत्री राणेंनी दिला. कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात आयोजित सभेत ते बोलत होते. 

पालकमंत्री म्हणाले, कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून महेश सारंग मैदानात आहेत. अपक्ष काही उभे आहेत. भाजपचे आम्ही कार्यकर्ते असून अधिकृत उमेदवार आमचे आहेत. अपक्ष उमेदवारानही भाजपात प्रवेश केलाय. मायकल डिसोजा यांना पक्षात घेताना प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याशी त्यांचा संवाद झाला होता. आता ही निवडणूक खासदार नारायण राणे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षानं उमेदवारी दिलेली असताना विरोधात उभं राहणं पक्षशिस्तीत नाही. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची बदनामी होता नये याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे कुणीही कुठलं आमिष दाखवले तरीही कमळाच्या उमेदवाराला साथ द्यावी. नारायण राणे व रविंद्र चव्हाण यांनी ज्याच्या डोक्यावर हात ठेवला त्यांना साथ द्या असं आवाहन त्यांनी केले. कायदा कुणीही हाती घेऊ नये, वातावरण खराब कुणी केलं तर मी जिल्ह्यात आहे एवढं लक्षात ठेवा असा इशारा त्यांनी दिला. रविंद्र चव्हाणांच्या नावानं कुणी फोन करत असेल तर मला फोन करा.‌ त्यांच्या नावावर काही गोष्टी खपवल्या जातात. त्यांना कल्पनाही नसते. तर, लक्ष्मी दर्शनाच काही लोक काम करत आहे. त्यावरही आमचं लक्ष आहे. ही निवडणूक आपल्या भविष्यासाठी, विकासासाठीची आहे. त्यामुळे समृद्धी आणण्यासाठी भाजपला साथ द्या असं आवाहन त्यांनी केले. 

दरम्यान, अपक्ष उमेदवार निवडून आला तर निधी कुठून आणणार ? त्यामुळे अधिकृत उमेदवाराला साथ द्या, हवा तेवढा निधी आम्ही उपलब्ध करून देऊ. कारण, महायुती सोडून कुणाला निधी मिळणार नाही. अपक्षाला तर मुळीच निधी देणार नाही. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी काय केलं ? हे विसरू नका. तेव्हा कणकवलीला निधी न देणार कोण होत ? जर  पक्षपातीपणा केला नसता ही भुमिका घेतली नसती. आज उबाठाला त्यांचच औषध पाजण्याच काम आम्ही करत आहे. महेश सारंग यांना निवडून द्या, ते मागतील तेवढा निधी दिला जाईल असा विश्वास व्यक्त केला. मायकल डिसोजा यांनी आल्याआल्या वार करण्याची गरज नव्हती. समजावून देखील पक्षाच्या विरोधात उभे राहिले. त्यामुळे सगळी ताकद भाजपच्या मागे उभी करा. डोक्यावर बर्फ अन् तोंडात साखर घेऊन निवडणूक लढवा. इथला विकास आम्हीच करू शकतो. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना साथ द्या. नारायण राणे, रविंद्र चव्हाण यांच्या मागे उभे असून महेश सारंग यांना मत म्हणजे राणे- चव्हाणांना मत अस विधान केलं

 दरम्यान, माजी मंत्री दीपक केसरकर म्हणाले, मागचा इतिहास लक्षात घेऊन आता कोणताही फरक पडू देता नये. अपक्ष उमेदवाराला आमचा पाठिंबा नाही. तो जिल्हा परिषद उमेदवार महेश सारंग यांनाच आहे. ही निवडणूक नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली महायुती लढत आहे. कोलगाव येथे जिल्हा परिषद बिनविरोध झाली असती. मात्र, मुद्दाम अपक्ष उमेदवार उभा केल्याचं त्यांनी सांगितलं.‌ तसेच जिल्हा परिषद उमेदवार महेश सारंग म्हणाले, ही निवडणूक वेगळ्या दिशेने गेली आहे. भाजप म्हणून आपण लढू अन् जिंकू. त्यामुळे अदृश्य शक्तीला न जुमानता विकासाला मत द्यावे असं आवाहन त्यांनी केल. मागे अल्प मतांनी माझा पराभव झाला. पण, मी थांबलो नाही. आज नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली महायुती लढत आहेत. मात्र, काही अपक्ष उमेदवार इथून उभे आहेत. त्यांच्या बोलण्यास न भुलता विकासाला मत द्या असं आवाहन श्री. सारंग यांनी केल. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उमेदवार महेश सारंग, शशी सावंत, संतोष राऊळ, पंचायत समिती उमेदवार प्राजक्ता केळुसकर, संध्या हळदणकर, मंगेश तळवणेकर आदी उपस्थित होते.