
दोडामार्ग : दोडामार्ग मधील महायुतीचे काही बंडखोर पदाधिकारी व कार्यकर्ते आमच्या उमेदवारांच्या विरोधात काम करत आहेत. त्यांना वारंवार सांभाळून घेतले जाते . मात्र, आता त्यांची गय केली जाणार नाही. त्यांची मस्ती उतरवण्यासाठी आमच्याकडे वेगळ्या प्रकारचे वॅक्सिन, डोस आहेत. गरज पडली तर ते वापरायलाही आम्ही तयार आहोत, असा थेट इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी एकनाथ नाडकर्णी यांचे नाव घेत दिला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पाश्वभूमीवर सासोली येथील एका सभागृहात महायुतीच्या कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आमदार दीपक केसरकर, जिल्हा बॅंक अध्यक्ष मनीष दळवी, शिंदे शिवसेना सावंतवाडी विधानसभा मतदारप्रमुख प्रेमानंद देसाई, तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस, कसई-दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण उपस्थित होते.
ना. राणे बोलताना म्हणाले, काही माध्यमांतून अपक्ष जास्त निवडून येणार अशा बातम्या वाचून तालुक्यात नक्की काय प्रकार सुरू आहे हे पाहण्यासाठी हा दौरा आखण्यात आला आहे. महायुतीचे पदाधिकारी म्हणून जनतेत जाताना आमच्याच माध्यमातून योग्य संदेश जाणार आहे. खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून दिलेल्या उमेदवारालाच निवडून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. आम्ही राणेंचे निष्ठावंत आहोत असे सांगत बंडखोरांकडून संभ्रम निर्माण केला जात आहे. खासदार राणे समोर आले की मंडळाच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात व खा. राणे यांना भावनिक करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, निवडणूक आली की याच लोकांचा ३६० अंशात बदल होतो, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो.
१० तारखेला उजाडणार नाही का ?
एकनाथ नाडकर्णी यांच्याशी चर्चा करून त्यांना सगळ्या गोष्टी साध्या भाषेत समजावून सांगितल्याचे ना. राणे म्हणाले. आम्हाला फक्त प्रामाणिक कार्यकर्ते हवेत. कोणीही निवडणूक लढवावी, पण मस्ती खपवून घेतली जाणार नाही. खा. राणेंमुळे जिल्ह्यात अनेकजण झेडपी अध्यक्ष झाले असे सांगत बंडखोर लोकांनी खूप मस्ती केली, आता ती उतरवण्याची वेळ आली आहे, असा इशारा ना. राणे यांनी दिला.










