राज्यात सिंधुदुर्ग अव्वल! २८२ कोटींचे शंभर टक्के वितरण मार्चपूर्वीच पूर्ण

पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली निधी वितरणात सिंधुदुर्गचा डंका
Edited by: लवू महाडेश्वर
Published on: March 28, 2026 00:39 AM
views 16  views

सिंधुदुर्गनगरी : मार्च एन्ड जवळ येत असताना प्रशासनात नेहमीप्रमाणे निधी खर्च आणि वितरणासाठी धावपळ सुरू असते. मात्र, यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्याने ही परंपरा मोडीत काढत मार्च एंडपूर्वीच १०० टक्के निधी वितरणाची ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याने २८२ कोटी रुपयांचा वार्षिक आराखडानुसार प्राप्त निधी पूर्णतः वितरित करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर राज्यातील अमरावती जिल्हा द्वितीय स्थानी राहिला आहे.

जिल्ह्यात विविध सरकारी विभागांच्या सुमारे १०० योजनांअंतर्गत मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. या योजनांसाठी राज्य शासनाकडून २८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. विशेष म्हणजे, मार्च अखेर येण्यापूर्वीच हा संपूर्ण निधी संबंधित विभागांना वितरित करण्यात यश आले आहे.

या निधी वितरणामुळे जिल्ह्यातील अनेक विकासकामे पूर्णत्वाच्या टप्प्यावर पोहोचली असून, काही ठिकाणी कामांना वेगही मिळाला आहे.

निधी वेळेत वितरित व्हावा आणि विकासकामे रखडू नयेत यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने नियोजनबद्ध कामकाज करत प्रक्रिया गतिमान ठेवली.

यामध्ये जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधत निधी वितरणाची अंमलबजावणी वेळेत पूर्ण केली.

या संयुक्त प्रयत्नांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याने केवळ निधी वितरणातच नव्हे, तर प्रत्यक्ष विकासकामांच्या अंमलबजावणीतही आघाडी घेतली आहे. मार्च एंडपूर्वीच १०० टक्के निधी वितरित करण्याची ही कामगिरी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरत असून, राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.