'त्या' बेवारस इसमाच्या मदतीला धावले सिंधुदुर्ग पोलीस !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 18, 2023 19:55 PM
views 278  views

सिंधुदुर्ग : झारखंड येथील इसम सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्टेशन येथे उतरला असता रेल्वे निघून गेल्याने तो बेवारस पणे फिरताना आढळून आल्याने सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत त्यांच्या ताब्यात दिले.  

        16 नोव्हेंबर 2023 रोजी विजय कल्याण हेमरोम रा.कोचेडेगा, पोलीस ठाणे-बसिया इटाम गुमराह राज्य झारखंड हा मुंबई ते गोवा रेल्वेने जात असताना सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्टेशन येथे उतरला असताना रेल्वे पुढे निघून गेली. त्यामुळे सदर ईसम हा तेथच उतरून परिसरात बेवारस रित्या फिरताना रानबाबूळी येथे  सागर कवच दरम्यान पोलीस ठाणे अंतर्गत लावण्यात आलेल्या नाकाबंदी अंमलदार ममता चिंदरकर यांना मिळुन आलेला होता. तो व्यवस्थित माहिती देत नसल्याने त्याला पेट्रोलिंग दरम्यान ताब्यात घेऊन पोलीस ठाणे येथे आणले होते. तरी पण तो माहिती देत नसल्याने बेवारस म्हणून त्यास सविता आश्रम, पणदुर आश्रमात दाखल करून घेण्यासाठी पत्र देऊन नातेवाईकांचा शोध घेई पर्यंत आश्रमात ठेवण्यात आलेले होते. 

      या बेवारस इसमाने दिलेल्या किरकोळ व जुजबी माहितीच्या आधारे व तांत्रिक तपासावरून त्याच्या नातेवाईकाचा शोध घेतला असता तो झारखंड येथील असल्याचे समजून आल्याने तेथील नातेवाईक यांचेशी संपर्क साधून पोलिसांनी ही हकीगत सांगितली.  त्यानंतर नातेवाईक यांनी आपण सिंधुदुर्ग येथे येत आहोत व आपल्या भावाला ताब्यात घेत आहोत असे सांगितले. त्या इसमाची बहीण नीलमणी हेमरोम रा.झारखंड व इतर नातेवाईक हे आज रोजी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे आले होते. त्यानंतर सदर इसमास सविता आश्रम येथुन त्यांचे ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी बजावली आहे.