
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हाची पोलीस भरती प्रक्रिया आता सुरु होत असून १४२ पदासाठी ८०४२ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. 19 जूनपासून ही भरती प्रक्रिया सुरू होईल व एक जुलै रोजी संपेल असे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांनी दिली.
११३ पोलीस कॉन्स्टेबल, ५ बँड्समन व २४ चालक कॉन्स्टेबल अशा एकूण 142 पदांसाठी जिल्हा पोलीस दलात ही भरती होत आहे. प्रथम मैदानी व त्यानंतर लेखी परीक्षा यामध्ये गुणवत्तेनुसार व आरक्षणा नुसार पारदर्शक भरती प्रक्रिया होणार आहे . ५ मार्च 2023 रोजी ही भरती प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र नंतर लागलेल्या निवडणूक आचारसंहितेमुळे प्रत्यक्ष भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. त्यामुळे आता १९ जून पासून ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन हाती घेण्यात आले आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत रिक्त असलेल्या १४२ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होईल, ११८ पोलीस कॉन्स्टेबल साठी ५९२० पात्र अर्ज, पाच बँड्समन पदासाठी ७८३ उमेदवारांचे पात्र अर्ज, व २४ ड्रायव्हर कॉन्स्टेबल पदासाठी १३३९ पात्र अर्ज आहेत अशी ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली.
पुरुषांसाठी उंची व छाती माप मध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची शंभर मीटर धावणे, सोळाशे मीटर धावणे, व गोळा फेक ही मैदानी परीक्षा होईल, तर महिलांसाठी उंची मध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची शंभर मीटर धावणे, आठशे मीटर धावणे व गोळा फेक ही मैदानी परीक्षा होईल. त्यानंतर उमेदवारांची लेखी परीक्षा होऊन गुणवत्ता यादी जाहीर होईल. ही भरती प्रक्रिया पूर्णतः गुणवत्तेवर आधारित असून कोणत्याही उमेदवाराने ओळख, वशिलेबाजी करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी केले आहे.