डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर

जिल्हाध्यक्षपदी भरत केसरकर, उपाध्यक्ष सचिन रेडकर, सचिवपदी संदीप देसाई
Edited by: विनायक गावस
Published on: October 19, 2022 16:25 PM
views 142  views

सिंधुदुर्ग : डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन महाबळेश्वर भिलार येथे २९ ऑक्टोबर २०२२ रोजी होत असून कोकण विभागातून मोठ्या संख्येने सदस्य यावेळी उपस्थित राहणार आहेत. याच पार्श्वभूमीवर डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्यची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी भरत केसरकर, उपाध्यक्षपदी सचिन रेडकर, सचिवपदी संदीप देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर साईनाथ गावकर, कृष्णा ढोलम, समीर सावंत, दिपेश परब, श्रीधर साळुंखे, उमेश बुचडे, प्रमोद गवस यांची जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी तर विनायक गांवस यांची प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष राजा माने, कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. 



डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन महाबळेश्वर (भिलार) येथे २९ ऑक्टोबर २०२२ रोजी होत असून या अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष पालकमंत्री शंभूराजे देसाई तर कार्याध्यक्ष माजी राज्यपाल खा. श्रीनिवास पाटील हे असणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. तर लवकरच रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्याची कार्यकारिणी कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण जाहीर करणार आहेत.


दरम्यान, शिक्षणमंत्री दीपक केसरकर व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण यांनी भेट घेत या अधिवेशनास उपस्थित राहण्याचे निमंत्रण त्यांना दिले. यावेळी मंत्री दीपक केसरकर, रवींद्र चव्हाण यांनी अधिवेशनास आवर्जून उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, सचिव संदीप देसाई, सदस्य समीर सावंत, कृष्णा ढोलम आदी जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.