
कुडाळ : वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि ग्रंथांचे महत्त्व जनमानसांत रुजवण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने 'सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२५' चे आयोजन करण्यात आले आहे. हा ग्रंथोत्सव गुरुवार, दि. २७ मार्च आणि शुक्रवार, दि. २८ मार्च २०२६ रोजी कुडाळ येथील श्री महालक्ष्मी हॉल (गुलमोहर हॉटेल जवळ) येथे संपन्न होणार आहे.
ग्रंथोत्सवाचे आकर्षण: ग्रंथ प्रदर्शन व विक्री
दोन दिवस चालणाऱ्या या ग्रंथोत्सवात सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत भव्य ग्रंथ प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली आहे. यात वाचकांना विविध विषयांवरील पुस्तकांचा खजिना उपलब्ध होणार आहे.
पहिला दिवस: गुरुवार, २७ मार्च २०२६
सकाळी ९:३० वा.: ग्रंथपूजन आणि भव्य ग्रंथदिंडीचा शुभारंभ कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर आणि पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक यांच्या हस्ते होईल.
दुपारी १२ ते १ वा.: 'दशावतार' कार्यक्रम - न्यू इंग्लिश स्कूल देवबाग येथील विद्यार्थ्यांचे सादरीकरण.
दुपारी २ ते ३ वा.: 'कै. गंगाराम गवाणकर यांच्या साहित्यावर चर्चा' - यात हेमंत पाटकर, प्रसाद खाडपकर, प्रज्ञा चव्हाण आणि सोनाली गोडे हे मान्यवर सहभागी होतील.
सायंकाळी ३ ते ४ वा.: प्रफुल वालावलकर, डॉ. संजिव आकेरकर आणि वर्षा वैद्य यांच्या 'श्रुतिका' कार्यक्रमाचे सादरीकरण.
दुसरा दिवस: शुक्रवार, २८ मार्च २०२६
सकाळी ११ ते १ वा.: 'आनंद यात्रा' - सादरीकरण: श्री. प्रसाद कुलकर्णी.
दुपारी २ ते ३ वा.: 'वाचन संस्कृती वाढवण्यासाठी ग्रंथपालांची भूमिका' या विषयावर चर्चासत्र. यात संजय शिंदे, पूनम नाईक, अक्षता सावंत आणि सिद्धेश राऊळ हे ग्रंथपाल मार्गदर्शन करतील.
दुपारी ३ ते ४:३० वा.: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शतायु ग्रंथालयांचा सन्मान सोहळा आणि ग्रंथोत्सवाचा समारोप.
अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी सिंधुदुर्ग सचिन हजारे यांनी दिली.
समारोप कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक अनंत अप्पाजी वैद्य, रमेश चंद्रकांत बोन्द्रे आणि अरविंद रामचंद्र शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. जिल्ह्यातील १० जुन्या आणि नामांकित शतायु ग्रंथालयांचा यावेळी विशेष गौरव करण्यात येणार आहे.
या ग्रंथोत्सवाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथोत्सव जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष प्रशांत पाटील (प्र. सहा. ग्रंथालय संचालक), सदस्य सचिव सचिन हजारे (जिल्हा ग्रंथालय अधिकारी) आणि समितीचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.
"ग्रंथ आमचे साथी, ग्रंथ आमुच्या हाती। ग्रंथ उजळती अज्ञानाच्या, अंधाराच्या राती॥" या ब्रीदवाक्याला अनुसरून आयोजित या ग्रंथोत्सवात सिंधुदुर्गातील तमाम रसिक वाचक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रंथोत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.











