
कुडाळ : शहरातील नामांकित सामाजिक संस्था **'स्वामी फाऊंडेशन'**च्या वतीने रामनवमी उत्सवाचे औचित्य साधून एक आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. श्री कुडाळेश्वर देवस्थान येथे "कुडाळचा तारणहार" या नावाने, ग्रामदेवतांच्या मनमोहक छायाचित्रांनी साकारलेल्या विशेष दिनदर्शिकेचे (कॅलेंडर) प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. सौ. दिपलक्ष्मी पडते (माजी जि.प. अध्यक्ष), सौ. प्राजक्ता शिरवलकर (नगराध्यक्ष), विनायक राणे (माजी नगराध्यक्ष), ओंकार तेली, विलास कुडाळकर (जेष्ठ रंगभूषाकार), राजू पाटणकर (लाजरी अध्यक्ष), विनायक केसरकर (स्वामी भक्त), देवस्थान कमिटीचे गोपाळ राऊळ, प्रसाद कुंटे, महेश राऊळ आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
८००० कुटुंबांपर्यंत पोहोचणार 'तारणहार'
स्वामी फाऊंडेशनचे अध्यक्ष राकेश कांदे, सचिव शंकर चव्हाण आणि खजिनदार रेहान शेख यांनी या उपक्रमाचे नियोजन केले आहे. रामनवमीच्या निमित्ताने पुढील १५ दिवसांत कुडाळ शहरातील तब्बल ८,००० कुटुंबांच्या घराघरांत हे कॅलेंडर विनामूल्य पोहोचवण्यात येणार आहे.
"आपल्या ग्रामदेवतांचे स्मरण प्रत्येक घरात व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे." - राकेश कांदे (अध्यक्ष, स्वामी फाऊंडेशन)
कॅलेंडर कोठे उपलब्ध होतील?
ज्या भाविकांना घरपोच कॅलेंडर मिळाले नसेल, त्यांना १५ एप्रिलनंतर खालील ठिकाणी ते उपलब्ध होऊ शकतील:
कुडाळेश्वर मंदिर: महेश राऊळ, केळबाई मंदिर: कृष्णा घाडी, भैरव मंदिर: धनंजय राऊळ, महालक्ष्मी मंदिर: बाबु गुरव
समादेवी मंदिर: महेश ओटवणेकर, मारूती मंदिर: भुषण मठकर, या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन दीपक राऊळ यांनी केले. यावेळी राजेश मांजरेकर, आनंद लाड, आदित्य नाईक, अनिल शिवडावकर, अनुप जाधव यांसह बहुसंख्य स्वामी भक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.











