कविलकाटेतील 'ग्रीन-झोन' उठवण्यासाठी आ. निलेश राणे आक्रमक

मुख्याधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 26, 2026 17:56 PM
views 37  views

कुडाळ : कुडाळ नगरपंचायत हद्दीतील मौजे कविलकाटे येथील नागरिकांच्या जमिनीवर असलेल्या 'ग्रीन-झोन'च्या जाचक अटींमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. या गंभीर प्रश्नावर सामाजिक कार्यकर्ते समिल प्रभाकर जळवी यांनी आज, २६ मार्च २०२६ रोजी कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या निवेदनाची तत्काळ दखल घेत आ. निलेश राणे यांनी कुडाळ नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना सदर ग्रीन-झोन उठवण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

कविलकाटे वॉर्ड क्र. १ मधील जवळपास ६०% जमिनीवर ग्रीन-झोन लागू असल्याने येथील शेतकरी आणि नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून अडचणीत सापडले आहेत. नगरपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही हालचाल होत नसल्याने अखेर समिल जळवी यांनी आमदार राणे यांचे लक्ष या विषयाकडे वेधले.

 कविलकाटेवासीयांना खालील समस्यांना सामोरे जावे लागत आहे. स्वतःच्या जागेत साधे घर बांधणे किंवा दुरुस्ती करणे अशक्य झाले आहे. जमिनीवर ग्रीन-झोन असल्याने बँकांकडून गृहकर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत. नवीन घरासाठी घर नंबर मिळवणे किंवा घरापर्यंत वीज जोडणी घेणे तांत्रिक कारणास्तव कठीण झाले आहे.

कुडाळमधील कार्यक्रमादरम्यान समिल जळवी यांनी आ. निलेश राणे यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आमदार राणे यांनी कुडाळ नगरपंचायत कार्यालयाला भेट दिली आणि मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली. "नागरिकांच्या हितासाठी हा ग्रीन-झोन उठवण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करा," असे स्पष्ट आदेश त्यांनी यावेळी दिले.

आमदारांच्या या भूमिकेमुळे गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला कविलकाटे येथील जमिनीचा प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर असून, पुढील काही महिन्यांत हा झोन उठण्याची आशा निर्माण झाली आहे.