सिंधुदुर्ग आणि गोवा राज्य पोलीस आंतरराज्य पोलीस समन्वय बैठक संपन्न

Edited by: विनायक गांवस
Published on: November 17, 2025 17:41 PM
views 55  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस आणि गोवा राज्य पोलीस यांच्यात समन्वयाच्या अनुषंगाने आंतरराज्य पोलीस समन्वय बैठक आज, सोमवार, १७ नोव्हेंबर रोजी सावंतवाडी येथील शासकीय विश्रामगृह येथे दुपारी १ ते ३.३० या वेळेत पार पडली. 

महाराष्ट्रात आणि गोव्यात होऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच दोन्ही राज्यांमध्ये आवश्यक पोलीस मदत, आरोपींची देवाणघेवाण आणि संयुक्त कारवाई यांसारख्या विषयांवर समन्वय साधण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या महत्त्वाच्या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम यांनी महाराष्ट्राच्या वतीने उपस्थिती लावली. तर, गोवा राज्याच्या वतीने नॉर्थ गोवा पोलीस अधीक्षक श्री. राहुल गुप्ता आणि बिचोलीच्या प्रभारी डीवायएसपी श्रीमती श्रीदेवी (सर्व भा.पो.से.) हे उपस्थित होते. या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ४ उपअधीक्षक (DySP), ८ पोलीस निरीक्षक (PI) आणि अन्य अधिकारी वर्ग देखील या बैठकीत सहभागी झाला होता.

बैठकीत प्रामुख्याने गोवा व महाराष्ट्रात घडणाऱ्या विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये 'पाहिजे असलेले' (Wanted) आणि रेकॉर्डवरील आरोपींची प्रभावी देवाण-घेवाण, तसेच गुन्हेगारी माहितीचे त्वरित आदान-प्रदान या विषयांवर मार्गदर्शन आणि सखोल चर्चा करण्यात आली. दोन्ही राज्यांच्या सीमेवर गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी आणि निवडणूक काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने सीमा तपासणी नाक्यांवर (बॉर्डर चेक पोस्ट) परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्यावर देखील सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीमुळे दोन्ही राज्यांच्या पोलीस दलांमधील समन्वय अधिक मजबूत होऊन सीमाभागातील गुन्हेगारी नियंत्रणात मोठी मदत मिळणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.