
सिंधुदुर्गनगरी : किशोरवयीन मुला-मुलींचे शारीरिक, मानसिक, भावनिक व सामाजिक आरोग्य सुदृढ करण्यासोबतच त्यांच्यात आत्मविश्वास, निर्णयक्षमता, नेतृत्वगुण आणि जीवनकौशल्ये विकसित करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्गात दोन दिवसीय जिल्हास्तरीय क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने, जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या आरोग्य विभागामार्फत शरद कृषी भवन येथे या कार्यशाळेचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले. (Adolescent Health Workshop in Sindhudurg)
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबईच्या सल्लागार श्रीमती अंजू उप्पल, किशोरवयीन आरोग्य कार्यक्रमाचे सहाय्यक संचालक डॉ. रवींद्र चौधरी, सल्लागार डॉ. संदीप राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी आणि जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. स्वप्निल मालखेडे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचा प्रारंभ करण्यात आला.
राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम (RKSK) अंतर्गत आयोजित या कार्यशाळेत किशोरवयीन मुला-मुलींच्या आरोग्यविषयक गरजा, त्यांच्या समस्या आणि बदलत्या वयातील आव्हानांचा विचार करून त्यांना योग्य मार्गदर्शन व सक्षम बनविण्यावर भर देण्यात येत आहे. किशोरवयीन वय हा व्यक्तिमत्त्व घडणीचा महत्त्वाचा टप्पा असल्याने या काळात योग्य आरोग्यविषयक माहिती, समुपदेशन आणि जीवनकौशल्यांचे प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे.
दोन दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये किशोरवयीन आरोग्य व पोषण, मानसिक स्वास्थ्य, लैंगिक व प्रजनन आरोग्य, मासिक पाळी व्यवस्थापन व स्वच्छता, व्यसनमुक्ती, डिजिटल सुरक्षितता, शिक्षण तसेच करिअरविषयक मार्गदर्शन अशा विविध विषयांवर सहभागी आधारित पद्धतीने चर्चा, सत्रे आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे. या माध्यमातून किशोरवयीन मुला-मुलींना स्वतःच्या आरोग्याबाबत सजग होण्यासह योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.
या कार्यशाळेचे विशेष महत्त्व म्हणजे जिल्ह्यात प्रशिक्षित मास्टर ट्रेनर तयार करणे. प्रशिक्षण घेतलेल्या मास्टर ट्रेनर्सच्या माध्यमातून पुढील काळात जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य उपकेंद्र स्तरावर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यामुळे किशोरवयीन आरोग्यविषयक माहिती, मार्गदर्शन आणि समुपदेशनाची सुविधा ग्रामीण भागातील मुला-मुलींपर्यंत पोहोचविण्याचा मार्ग अधिक व्यापक होणार आहे.
या कार्यशाळेत किशोरवयीन मुला-मुलींसह आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग आणि पंचायत राज विभागातील अधिकारी-कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
किशोरवयीन मुला-मुलींच्या आरोग्यविषयक प्रश्नांकडे केवळ वैद्यकीय दृष्टिकोनातून न पाहता शिक्षण, सामाजिक वातावरण, मानसिक आधार आणि समुपदेशन या बाबींचाही एकत्रित विचार करण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधणे गरजेचे आहे. या दोन दिवसीय कार्यशाळेमुळे जिल्ह्यात किशोरवयीन आरोग्यविषयक जनजागृती आणि मार्गदर्शनाची यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








