
सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचारी यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा निर्णय होऊन सव्वा वर्ष झाले तरी या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेतलेले नाही. आपल्या मागण्यांकडे शासनाकडून विलंब होत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून आपल्या न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी १९ ते २२ ऑगस्ट या चार दिवसांचे कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी संघटना सिंधुदुर्गच्या वतीने शासन आणि प्रशासनाला दिले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत गेली १० वर्षे कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत घेण्याबाबत १४ मार्च २०२४ रोजी शासन निर्णय झाला. मात्र या निर्णयाला आता सव्वा वर्ष उलटून गेले तरी या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही. या कर्मचाऱ्यांना समावून घेण्याचा निर्णय प्रलंबित असतानाच नव्याने पदभरती केली जात आहे. हा एक प्रकारे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्यायच आहे. तसेच हे कर्मचारी अल्प मानधनात काम करत असून गेली ५ -६ महिने मासिक वेतन वेळेत न होता २-३ महिने थकीत राहतो. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येत आहे. समायोजन आणि दरमहा वेतन मिळावे आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी १९ ते २२ ऑगस्ट या चार दिवसांचे कामबंद आंदोलन पुकारले असल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष हेमदिप पाताडे यांनी दिली आहे.
या आहेत प्रमुख मागण्या...
१४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार समायोजन व्हावे
दरमहा वेळेत वेतन द्यावे
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन होत नाही तो पर्यंत नव्याने पदभरती करू नये
सन २०२४-२५ ची मासिक वेतनवाढ व लॉयल्टी बोनस देण्यात यावा
समुदाय आरोग्य अधिकारी यांचे बदली धोरणानुसार एनएचएम अधिकारी कर्मचारी यांना बदली धोरण लागू करावे
ईपीएफ योजना व गट विमा लागू करावा