
सिंधुदुर्ग : महिला आणि बाल विकास मंत्रालय, भारत सरकार आणि महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र सरकार अंतर्गत विशेष दत्तक संस्था म्हणून कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधदुर्ग यांना आज मान्यता मिळाली. विशेष दत्तक संस्था म्हणजे अनाथ, निराधार, किंवा पालकांनी सोडून दिलेल्या मुलांचे दत्तकविधान म्हणजे अडॉप्शन करण्यासाठी मान्यताप्राप्त संस्था होय. या संस्था मुलांचे पुनर्वसन करण्यासाठी काम करतात आणि दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना मदत करतात. कोकण संस्था गेली १३ वर्षे मुलांच्या शैक्षणिक, आरोग्य, जडणघडण आणि संगोपन या विषयावर राष्ट्रीय पातळीवर काम करते आहे.
याच अनुभवामुळे आणि निस्वार्थ कामामुळे कोकण कला व शिक्षण विकास संस्थेला विनाअनुदानित तत्वावर ही मान्यता मिळालेली आहे. सिंधदुर्ग जिल्ह्यात अशी एकही संस्था नसल्याने दत्तक घेऊन इच्छिणाऱ्या जोडप्याना योग्य ते मार्गदर्शन आणि मदत मिळत नव्हती. आता कोकण संस्थेला मिळालेली मान्यतेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांना काराची प्रक्रिया, पात्रता, सर्व कागदपत्रे, भावनिक तयारी आणि कायदेशीर आवश्यकतांबद्दल योग्य ते मार्गदशन मिळणार आहे. एकदा दत्तक मूल घेण्यासाठी मंजुरी मिळाल्यानंतर, जोडप्याला त्यांच्या पसंतीवर आधारित दत्तक घेण्यायोग्य मुलांचे प्रोफाइल दाखवणे पासून ते लीगल फॉर्मॅलिटीज पूर्ण करणेपर्यंतची सर्व मदत आता आपल्या जिल्ह्यात होणार आहे. त्यामुळे इच्छुक जोडप्यांना लांब पल्याचा प्रवास आता करावा लागणार नसून आपल्या स्थानिक भाषेत सर्व माहिती देण्यासाठी कोकण संस्था संवाद साधणार आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे कोकण संस्था आता कायदेशीररित्या अनाथ मुलांना सरकारच्या नियमाधीन राहून दत्तक देऊ शकतात, त्यामुळे मूल नसलेल्या इच्छुक जोडप्यांना आता पालक होण्याची संधी निर्माण झाली आहे. विशेष दत्तक संस्था म्हणून मान्यता मिळवण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष सिंधदुर्ग जिल्हा यांचे विशेष सहकार्य लाभले.