
कणकवली : कासार्डे-नागसावंतवाडी हा इको सेन्सिटिव्ह झोन असतानाही या भागात अवैध सिलिका उत्खनन सुरूच आहे. हा प्रकार म्हणजे सिलिका मायनिंग माफियांचा ‘रात्रीस खेळ चाले’ सारखा आहे. अवैध सिलिका उत्खनन व वाहतूक करणाºयांवर महसूल प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे शिवसेना उबाठा पक्षाच्या युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी निवेदनाद्वारे केली आहे. रात्री बेकायदेशीर उत्खनन सुरु असल्याबाबतचे पुरावे देशपांडे यांना सादर करत यांच्यावर प्रशासन कारवाई करणार का? असा सवाल त्यांनी केला.
निवेदनात म्हटले आहे की, कासार्डेतील अवैध मायनिंग उत्खनन व वाहतुकीबाबत वारंवार आपणास निवेदने देऊन उत्खनन व वाहतूक करणाºयांना प्रशासन पाठीशी घातले जात आहे. आता पाऊस गेले दोन दिवस कमी झाल्यानंतर कासार्डे नागसावंतवाडी व अन्य भागामध्ये मोठ्या प्रमाणावर रात्रीच्या वेळी अवैध उत्खनन चालू आहे. महसूल विभागाचे काही अधिकारी व कर्मचारी यांच्या संगणमताने रात्रीच्या वेळी चालू असलेल्या उत्खलनाला कारवाई पासून वाचवले जात आहे. रात्री ८ वाजल्यापासून ते पहाटे ६ वाजेपर्यंत हे अवैध सिलिका उत्खनन सुरू असून दिवसभरात अवैध उत्खनन बंद असल्याचे भासवले जात आहे. यामध्ये कासार्डे मधील नागसावंतवाडी ३ येथील ठिकाणी, कासार्डे तांबळवाडी आवळेश्वर येथे लिज असलेल्या दोन डोंगराच्या मधील जागेत, तसेच उत्तर दक्षिण गावठाण येथे कदमवाडी व एम.एम सी माईन्स यांच्या मधील भागात अनाधिकृत उत्खनन सुरू आहे.
तसेच कासार्डे येथील स्मशानभूमी जवळ लिजच्या डोंगराजवळ, हे उत्खनन रात्रीच्या वेळी सुरू आहे. दिवसभर हे उत्खनन बंद ठेवून त्याचा बॅकलॉग रात्रीच्या वेळी भरून काढला जात आहे. महसूल विभागाच्या तलाठी व मंडळाधिकारी यांना ही बाब माहिती असून त्यांच्याकडून याबाबत कोणतीही कायदेशीर भूमिका घेत कारवाई केली जात नाही. या उलट या प्रकाराकडे डोळेझाक करणे व रात्रीच्या वेळी मोबाईल बंद करून ठेवणे असे प्रकार आपल्या अधिकारी व कर्मचाºयांकडून सुरू आहेत.
अवैध सिलिका उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल हे सिलिका व्यावसायिक बुडवत असून अवैध वाहतूकप्रकरणी दुर्लक्ष होत आहे. तरी याबाबत एक प्रमुख पथक नेमून रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या अवैध उत्खनन तात्काळ रोखावे व त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देतेवेळी यावेळी राजू राठोड, अजित काणेकर, महेश कोदे, चेतन वालावलकर उपस्थित होते.