एकाच ठिकाणी तब्बल 20 ते 25 मगरींचे दर्शन

Edited by: विनायक गांवस
Published on: January 07, 2026 15:23 PM
views 311  views

सावंतवाडी : ओटवणे नदीपात्रात सध्या मगरींचे वाढते वास्तव्य अत्यंत धोकादायक बनत असून, नदीपात्राच्या आवारात चरण्यासाठी जाणाऱ्या गायी, म्हशी तसेच या परिसरात जाणाऱ्या ग्रामस्थांसाठी हे संकट वाढले आहे. या नदीपात्रात मगरींचे वास्तव्य गेले कित्येक वर्षे सातत्याने पाहायला मिळत असून, पूर्वी कधीतरी दृष्टीस पडणाऱ्या मगरी आता सातत्याने आणि मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. 

यातच २० ते २५ मगरींचे दर्शन एकाच ठिकाणी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ओटवणे-कापईवाडी येथील 'वडाचे गळू' परिसरात नदीकाठी मोठ्या संख्येने मगरी दिसून येत आहेत. या नदीपात्रालगत ओटवणे आणि विलवडे भागातील शेतकऱ्यांच्या बागायती आहेत. अनेक वर्षांपासून ओटवणे नदीपात्रात मगरींचे वास्तव्य आहे, पण आता मात्र त्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर मगरी दिसून येत असल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा मोठा फटका नदीकाठी असणाऱ्या बागायतदार शेतकऱ्यांना बसू शकतो.

सध्या तरी या मगरींनी पाळीव जनावरे किंवा माणसांवर हल्ला केल्याची घटना घडली नसली, तरी भविष्यात अशा घटना घडून प्राणहानी किंवा वित्तहानी होऊ शकते. याची गंभीर दखल घेऊन वनविभागाने तात्काळ या मगरींची संख्या कमी करण्यासाठी पावले उचलावीत आणि त्यांना नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडावे, जेणेकरून शेतकऱ्यांवरील हे संकट दूर होईल, अशी मागणी ओटवणे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.