
ओरोस : सिंधुदुर्गच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी पदी शुभांगी साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी रवी पाटील यांची कोकण भवन येथे सहआयुक्त यापदावर बदली झाली.
सिंधुदुर्गचे विद्यमान अतिरिक्त जिल्हाधिकारी रवी पाटील यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागी साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज या नियुक्तीचे आदेश राज्य शासनाच्यावतीने काढण्यात आले. नव्याने नियुक्ती झालेल्या अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी यापूर्वी सिंधुदुर्गच्या निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून उत्तम प्रकारे काम सांभाळले होते. त्यानंतर त्यांची सामान्य प्रशासनाचा उपजिल्हाधिकारी या पदावर रत्नागिरी येथे बदली झाली होती.
दरम्यान विधानसभा निवडणूक काळतही त्यांनी सिंधुदुर्गात प्रभारी कार्यभार सांभाळला होता. शासनाच्या आताच्या पदोन्नतीच्या काळात झालेल्या बदलांमध्ये त्यांना पदोन्नती मध्ये सिंधुदुर्गच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. तर तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी रवी पाटील यांची कोकण भवन येथे सहआयुक्त म्हणून बदली झाली असल्याचे आदेश शासनाचे उपसचिव यांनी काढले आहेत.