
चिपळूण : कोकणच्या सांस्कृतिक वैभवात मानाचं स्थान असलेल्या, श्री लक्ष्मीनारायण देवस्थान, चिपळूण आयोजित 'श्रीकृष्ण व्याख्यानमाले'चं हे ९७ वे वर्ष विशेष ठरणार आहे. या वर्षीची व्याख्यानमाला ‘मातृशक्तीला समर्पित’ असून, सर्व सहा व्याख्यानं महिला वक्त्यांकडून होणार आहेत. ९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ही व्याख्यानमाला चिपळूणमधील, श्री लक्ष्मीनारायण मंदिरमध्ये संपन्न होणार आहे.
पहिल्या दिवशी डॉ. अभिधा घुमटकर यांचे व्याख्यान
या व्याख्यानमालेचा शुभारंभ शनिवार, ९ ऑगस्ट रोजी मुंबई येथील डॉ. अभिधा घुमटकर यांच्या व्याख्यानाने होणार आहे. “विज्ञानाचा इतिहास” हा त्यांचा विषय असून त्यांनी आपल्या जन्मांधतेवर मात करत इतिहास विषयात पीएच.डी. मिळवली आहे. सध्या त्या मुंबईतील एका नामवंत महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.
अभिनेत्री संपदा जोगळेकर ‘कलेतील आत्मभान’ सांगणार
१० ऑगस्ट, रविवार रोजी प्रसिद्ध अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुळकर्णी “कलेतील आत्मभान” या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. रंगभूमीवरील यशस्वी कारकीर्दीनंतर त्यांनी झगमगत्या दुनियेतून निवृत्त होऊन कोकणात शेतीचा स्वीकार केला आहे. उच्च शिक्षित आणि संवेदनशील अभिनेत्री म्हणून त्यांचे स्थान लक्षणीय आहे.
सुनीताराजे पवार यांचे ‘स्त्री – काल, आज आणि उद्या’
११ ऑगस्ट, सोमवार रोजी पुण्याच्या सुनीताराजे पवार “स्त्री – काल, आज आणि उद्या” या विषयावर बोलणार आहेत. त्या संस्कृती प्रकाशन या ख्यातनाम संस्थेच्या प्रमुख असून, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह, तसेच अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनातही त्यांचा सक्रीय सहभाग असतो.
अर्चना गोडबोले यांचे पर्यावरण जागृतीविषयक भाषण
१२ ऑगस्ट, मंगळवार रोजी डॉ. अर्चना गोडबोले, पर्यावरण कार्यकर्त्या व संशोधिका, “कोकणातील देवराया – सद्यस्थिती आणि आव्हाने” या विषयावर व्याख्यान देतील. त्यांनी देवराई आख्यान हे पुस्तक लिहिले असून, कोकणातील निसर्ग, लोकजीवन आणि परंपरेचा सखोल अभ्यास त्यांनी केला आहे. हे वर्ष वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. वा. द. वर्तक यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यांच्या प्रेरणेने गोडबोले यांनी देवराई विषयावर संशोधन सुरू केले होते.
मंजुश्री गोखले यांचे ‘तुकयाची आवली’
१३ ऑगस्ट, बुधवार रोजी कोल्हापूर येथील लेखिका व संपादिका मंजुश्री गोखले यांचे “तुकयाची आवली” या विषयावर व्याख्यान होईल. त्या ‘नवस्नेह’ मासिकाच्या संपादिका असून त्यांची ५०हून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. यातील “तुकयाची आवली” ही कादंबरी विशेष गाजली आहे.
शेवटच्या दिवशी डॉ. नीलम माणगावे यांचे व्याख्यान
१४ ऑगस्ट, गुरुवार रोजी या व्याख्यानमालेचे समारोप व्याख्यान डॉ. नीलम माणगावे (जयसिंगपूर) यांचे होईल. “छोट्यांच्या मोठ्या गोष्टी” या विषयावर त्या बोलणार आहेत. साहित्य संमेलने, कविता, कथा व कादंबरीच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या डॉ. माणगावे यांचे हे व्याख्यान सामान्य माणसाच्या असामान्य कार्याचा ठाव घेणारे ठरणार आहे.
सर्व व्याख्यानं दररोज सायंकाळी ६:३० वाजता श्री लक्ष्मीनारायण देवस्थान प्रांगणात आयोजित करण्यात आली आहेत. याबाबत देवस्थानचे अध्यक्ष अॅड. मकरंद साठे व सेक्रेटरी श्री. सचिन कुलकर्णी यांनी सर्व कोकणवासीयांना या वैचारिक मेजवानीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.