
देवगड : देवगड तालुक्यातील मिठबाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात तीनशे वर्षांनंतर श्रीकृष्ण जन्माष्टमी सप्ताहाचा १५ व १६ रोजी उत्सव साजर होणार असून त्यामुळे पुन्हा मागील आठवणींना उजाळा मिळणार आहे. तब्बल तीनशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिठबाव श्री देव रामेश्वर मंदिरात गोकुळ अष्टमीचा सात प्रहरांचा दिड दिवसीय सप्ताह सोहळा शुक्रवार, १५ ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. पारंपरिक श्रद्धा,भक्ती आणि सांस्कृतिक वैभव यांचा संगम घडवणाऱ्या या सोहळ्याची ग्रामस्थांन कडून तयारी सुरू आहे.
या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे आकर्षक चित्ररथ, देखावे आणि दिंड्यांचे सादरीकरण. धार्मिक प्रसंगांचे कलात्मक दर्शन घडवणारे चित्ररथ सजवण्यासाठी ग्रामस्थांनी रंगीत वेशभूषा, पारंपरिक वाद्यांच्या ताल आणि सुबक मांडणीसह सज्जता सुरू केली आहे.
उत्सवाच्या अंतिम टप्प्यात दही हंडी व गोपाळकाला यांचा जल्लोष रंगणार आहे. गावागावातील एकोपा आणि संस्कृतीचे जतन हीच या सोहळ्याची खरी ओळख ठरणार आहे.ग्रामस्थांच्या भावना व्यक्त करताना त्यांनी सांगितले, “इतक्या वर्षांनी हा भव्य सोहळा पुन्हा अनुभवायला मिळतोय, हे आमच्यासाठी भाग्य आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आज नव्या उमेदीने जिवंत होत आहे.”
पारंपरिक पद्धतीने हंडी फोडण्याचा थरार आणि गोपाळकालाच्या निमित्ताने गावकरी एकत्र येऊन आनंद, ऐक्य व बंधुत्वाचा संदेश देणार आहेत.विशेष म्हणजे, हा उत्सव मिठबाव,तांबळडेग व कातवण या तिन्ही गावातील गावरयत एकत्र येऊन साजरा करणार आहेत.