कलमठात ग्रामविकास फेरीला शोभा यात्रेचे स्वरुप

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: September 17, 2025 19:57 PM
views 74  views

कणकवली : कलमठ येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या निमित्ताने कलमठ गावात बुधवारी ग्रामविकास फेरी काढण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात एकच वेळी २८ हजार  ग्रामपंचायतींमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे उद्घाटन करताना ऑनलाईन संबोधित केले. संपूर्ण राज्यात या अभियान शुभारंभ निमित्ताने  ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या होत्या.

कलमठ गावात याबाबत आगळे वेगळे नियोजन कलमठ करण्यात आले. सकाळी ८.३० वाजता ग्रामविकास फेरीचे आयोजन करून ग्रामसभेला जाण्याचे नियोजन करण्यात आले होते.

या ग्रामविकास फेरीस ग्रामस्थांनी उत्सफुर्तपणे प्रतिसाद दिल्याने सकाळी ८.३० वाजता या फेरीचे शोभायात्रेत रुपांतर झाले. पारंपारिक शेतक-यांची बैलगाडी, सावित्रीबाई, संत गाडगे बाबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या वेशभूषा, ढोल पथक , पारंपारिक महिलांनी सादर केलेल्या फुगड्या अशा वातावरणात ग्रामविकास फेरी पार पडली.  त्या नंतर कलेश्वर सभागृहात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानची ग्रामसभा सरपंच संदीप मेस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 

सभेचा शुभारंभ ८० वर्षाच्या आजी सुमती चिंदरकर आणि संत गाडगेबाबा वेशभूषेतील स्वप्नील मेस्त्री यांच्या हस्ते  दीपप्रज्वलन करून करण्यात आला. सभेला ३०० पेक्षा जास्त ग्रामस्थांनी हजेरी लावली.  या सभेत गावातील विविध विकास कामांबाबत चर्चा झाली. तसेच या सभेचे महत्त्व ग्रामसेवक प्रविण कुडतरकर यांनी पटवून दिले. 

१०० गुणांच्या कार्यक्रमात जबाबदारी वाटून घेऊया. कलमठ गावाला राज्याच्या नकाशावर झळकण्यासाठी सर्वांनी मेहनत करूया असे  बोलताना  सरपंच संदीप मेस्त्री  म्हणाले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी कलमठ ग्रामपंचायतला ग्रामस्थानी हात उंचावत अभिनयात यश प्राप्त करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आभार ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर यांनी मानले.

यावेळी उपसरपंच दिनेश गोठणकर, माजी सरपंच महेश लाड, माजी उपसरपंच स्वप्निल चिंदरकर,  ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर , सतीश नाडकर्णी, सदस्य नितीन पवार,अनुप वारंग, सुप्रिया मेस्त्री,स्वाती नारकर, सचिन खोचरे,पपू  यादव, माजी सरपंच विनिता बुचडे, प्रीती मेस्त्री, प्रियाली आचरेकर, श्रेयस चिंदरकर,नजराणा शेख, माजी सरपंच विनिता बुचडे, देविका गुरव, निसार शेख, संपर्क अधिकारी आरोग्यसेवक चंद्रमणी कदम, तनिष्का लोकरे, तेजस लोकरे, गुरु वर्देकर, तन्वीर शिरगावकर आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.