शिवतेजा महोत्सवामुळे स्थानिक कलाकारांना व्यासपीठ

रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे उद्घाटन
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 04, 2026 11:47 AM
views 45  views

कणकवली : कलमठ गावाला समृद्ध सांस्कृतिक परंपरा लाभली असून ही परंपरा जपण्याचे काम शिवतेजा मित्रमंडळ सातत्याने करीत आहे. शिवतेजा महोत्सवामुळे स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत आहे. कणकवली शहर आणि कलमठ गाव यांचे अतूट नाते आहे.या नात्यामुळे कलमठ गावात आयोजित करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रमांसाठी कणकवली शहरातील लोकप्रतिनिधींना आमंत्रित करून त्यांचा मान-सन्मान केला जातो.याबद्दल मी कलमठवासीयांचा ऋणी आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.

कलमठ-बाजारपेठ पिंपळपार येथे शिवतेजा मित्रमंडळाने आयोजित केलेल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे उद्घाटन श्री. पारकर यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.

उपनगराध्यक्ष सुशांत नाईक म्हणाले की, शिवतेजा मित्रमंडळातर्फे पिंपळपार येथे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या श्री सत्यनारायण पूजेसाठी मला निमंत्रण दिले जाते. या निमंत्रणाचा मान राखून मी दरवर्षी येथे उपस्थित राहतो. मंडळ गेली ३१ वर्षे सातत्याने सांस्कृतिक कार्यक्रमांसह समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.

यावेळी शिवतेजा मंडळातर्फे संदेश पारकर, सुशांत नाईक, संकेत नाईक व धीरज मेस्त्री यांचा सचिन कुवळेकर व अन्य सदस्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दिनेश पाटील यांनी केले. यावेळी सचिन कुवळेकर, उपाध्यक्ष अनिता साळगावकर, प्रसाद कांबळी, शशिकांत कांबळी,आर्या पोयेकर, अमित कांबळी, तुषार हजारे, सुयोग कांबळी आदी सदस्य उपस्थित होते.