सुवर्ण क्षण… काकीचा पुतण्याच्या हस्ते सन्मान

Edited by:
Published on: March 04, 2026 11:44 AM
views 24  views

दोडामार्ग : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिकुळे नं. १ या शाळेच्या इमारतीसाठी तब्बल ५० वर्षांपूर्वी रस्त्यालगतची ३ गुंठे मौल्यवान जागा विनामोबदला देत गावाच्या शैक्षणिक प्रगतीचा भक्कम पाया घालणाऱ्या गवस कुटुंबियांच्या सामाजिक योगदानाचा गौरव नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात करण्यात आला.

माजी प्रशासकीय अधिकारी मोहन गुणाजी गवस साहेब यांचे आजोबा कै. कृष्णा भिवा गवस व काका कै. भिवा कृष्णा गवस यांनी दिलेल्या या दातृत्वपूर्ण भूमीदानामुळे शाळेची उभारणी शक्य तर झालीचं पण अनेक पिढ्याही शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाल्या.

या उल्लेखनीय योगदानाबद्दल श्रीमती सरस्वती भिवा गवस यांचा शाल व श्रीफळ देऊन कार्यक्रमाध्यक्ष तथा माजी प्रशासकीय अधिकारी मोहन गवस साहेब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. काकीचा  पुतण्याचा हस्ते सन्मान हा क्षण उपस्थितांसाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानास्पद ठरला.

गावाच्या जडणघडणीत गवस कुटुंबियांचे योगदान मोलाचे असून सर्व स्तरातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. हा सन्मान म्हणजे सामाजिक बांधिलकीची परंपरा जपणाऱ्या कुटुंबाच्या कार्याला दिलेली मानाची पावतीच ठरली.