तेर्सेबांबर्डे मळावाडीत ६ फुटी मगर जेरबंद

ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निःश्वास
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 04, 2026 11:50 AM
views 81  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील तेर्सेबांबर्डे - मळावाडी परिसरात गेल्या काही तासांपासून असलेला भीतीचा वातवरण अखेर निवळले आहे. येथील शेतकरी हरि सावंत यांच्या बागेतील एका खड्ड्यात आढळलेली सहा फूट लांबीची मगर सुरक्षितपणे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. लोकवस्तीच्या इतक्या जवळ मगर आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

मळावाडी येथील शेतकरी हरि सावंत यांच्या बागेत एका खड्ड्यामध्ये काहीतरी हालचाल होत असल्याचे सकाळी निदर्शनास आले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता तिथे सुमारे ६ फूट लांबीची महाकाय मगर अडकल्याचे दिसून आले. लोकवस्ती आणि शेतीकामाचा परिसर असल्याने ग्रामस्थांमध्ये तातडीने भीतीचे वातावरण पसरले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मगरीला कोणतीही इजा होऊ न देता तिला खड्ड्यातून बाहेर काढण्याचे आव्हान होते. ग्रामस्थ आणि रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नांनंतर मगरीला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आले. वनविभागामार्फत या मगरीला आता नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे.

हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी खालील मान्यवरांनी व ग्रामस्थांनी मोलाची भूमिका बजावली. जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे, सरपंच रामचंद्र परब, पोलीस पाटील रमाकांत जाधव,  वनरक्षक प्रसाद पाटील, दिवाकर बांबर्डेकर आणि सहकारी, हरि सावंत, संजय जाधव, वामन बांबर्डेकर, रोशन परब, श्रीधर कुडतरकर, संजू देसाई, कल्पेश सावंत, प्रसाद परब व मळावाडीतील नागरिक 

"या भागात सध्या मगरींचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे. तरी शेतकरी आणि ग्रामस्थांनी नदीकाठी किंवा बागेत काम करताना अधिक सावधगिरी बाळगावी," असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.