केसरकर समर्थक शिवसैनिक गप्प का ?

अंतर्गत नाराजी की आदेश !
Edited by: विनायक गांवस
Published on: March 13, 2023 13:23 PM
views 363  views

सावंतवाडी : शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन ९ महिने झाले. मात्र, सावंतवाडी मतदारसंघात केसरकर अन् स्थानिक भाजप हा संघर्ष कायम दिसत आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब केसरकरांवर सडकून टीका करत आहेत. विरोधकांच अर्ध काम भाजपच हलक करत आहे. त्यात आता 'महाविकास आघाडी'ची भर पडली आहे. ठाकरे सेना, राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांनी मंत्री केसरकरांवर आगपाखड केली आहे. परंतु, एवढं होऊन देखील शिवसेनेचे पदाधिकारी, केसरकर समर्थक गप्प आहेत. नेहमी केसरकरांची ढाल म्हणून उभा राहणाऱ्या माजी नगराध्यक्षा अनारोजीन लोबो, जिल्हा प्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण ऊर्फ बबन राणे, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे आदी मंडळी गप्प का असा सवाल राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. न बोलण्याचे वरिष्ठांचे आदेश त्यांना आहेत की अंतर्गत नाराजी ? ज्यामुळे मंत्री केसरकरांवर आमचा शाखाप्रमुख सुद्धा टीका करेल असं जाहीर करणाऱ्या ठाकरे सेनेला केसरकर समर्थक शिवसैनिक उत्तर देत नाही आहेत. 


मागील काही महिन्यांपासून मित्रपक्ष भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी मंत्री केसरकर यांच्याविरोधात जाहीरपणे बोलत टिका केली होती. तर शहरातील विषयावरून माजी नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी आपली भूमिका मांडली होती. स्वबळाचा नारा त्यांनी दिला होता. आठवडा बाजार, शहरातील मतदारसंघातील समस्यांवरू केसरकरांना घरचा आहेर भाजपचे स्थानिक नेते देत असताना केसरकर समर्थक शिवसैनिक मात्र या विरोधात बोलताना दिसत नाहीत. खरेदी- विक्री संघ, ग्रामपंचायतीत केसरकरां विरूद्ध बोलणाऱ्यांवर तुटुन पडणारे हे समर्थक आता मात्रा गप्प आहेत. यातच नुकत्याच झालेल्या मेळाव्यात शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरेंवर सडकून टीका केली. यानंतर ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा या महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी केसरकरांवर चांगलंच शरसंधान साधलय. खोके घेतले नाहीत तर झोंबल का ? असा थेट सवाल त्यांनी केला आहे. यातच शिवसैनिकांच्या मेळाव्यात विरोधात कोण बोलत असेल तर ऐकून घेऊ नका. आजवर शांत राहिलो पण यापुढे टीका केली तर आम्हालाही बोलावं लागेल असं केसरकर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले होते. स्थानिक भाजपवरही त्यांनी टीका केली होती. परंतु, यानंतर लगेचच महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी केसरकरांवर सडकून टीका केली असताना सुद्धा केसरकर समर्थक शिवसैनिक गप्प आहेत. त्यामुळे नेहमी केसरकरांची ढाल म्हणून उभे राहणारे माजी नगराध्यक्षा अनारोजीन लोबो, जिल्हा प्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण ऊर्फ बबन राणे, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे केसरकरांवर टोकाची टिका होत असताना आज गप्प का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.