
निवडणूक स्पेशल
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकींचं चित्र अखेर स्पष्ट होऊ लागलं आहे. विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयामुळे महायुतीची पारंपरिक लढत या निवडणुकीतही दिसेल, अशी चर्चा सुरुवातीपासून होती. मात्र भाजपाने घेतलेल्या ठोस आणि आक्रमक भूमिकेवरच ठाम राहणे पसंद केल्याने आता जिल्ह्यात राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. त्यामुळे या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र दिसण्याऐवजी, खऱ्या अर्थाने सत्तेत असलेल्या भाजपाचा सामना हा सहयोगी शिंदे शिवसेनेशीच होणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण या नगरपरिषदसह कणकवली नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. जिल्ह्यात भाजपचे नितेश राणे तर शिंदे शिवसेनेचे दीपक केसरकर व निलेश राणे हे आमदार आहेत. नितेश राणेंकडे पालकमंत्री पद असून शिंदे शिवसेनेच्या दोन्ही आमदारांना शिवसेना नेते तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे पाठबळ आहे. शिवसेनेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात युतीने निवडणुका लढवायच्या अपेक्षा होत्या. मात्र भाजपाला यावेळी मिळालेली संधी दवडणे सुद्धा परवडणार नव्हतं. किंबहुना पालकमंत्री नितेश राणे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असून अधिकाधिक कार्यकर्त्यांना या निवडणुकांमध्ये निवडणूक लढवण्याची संधी मिळाली पाहिजे, ही भूमिका कायम ठेवली. विधानसभा लोकसभा या मोठ्या निवडणुका महायुतीने लढविणे योग्यच आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीने लढविल्यास त्याचा बराच फटका अन्य निवडणुका रात्रंदिवस नेत्यांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना बसत असतो. या भूमिकेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिंदे शिवसेना व भाजपाने सुरुवातीला मैत्रीपूर्ण निवडणूक लढवाव्यात आणि सत्ता स्थापनेवेळी एकत्र यावे अशी आपली उघड भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर शिंदे शिवसेनेकडून मात्र या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून व्हावे यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला गेला. यात खासदार व भजपाचे जेष्ठ नेते नारायण राणे यांनीही या निवडणुका युतीने लढविल्या जाव्यात अशी इच्छा व्यक्त केली होती. त्याचं अनुषंगाने भाजपाकडून पालकमंत्री व स्थानिक टीम यांनी मैत्रीपूर्ण लढतीचाचं निर्णय घेतला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस संपल्याने व कणकवली वगळता अन्य सर्वच ठिकाणी भाजपा, शिंदे शिवसेना व उबाठा शिवसेना अशी पॅनल बांधणी झाल्याने आता जिल्ह्यातील निवडणुकीच चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे.
भाजप व शिंदे गटात ‘मैत्रीपूर्ण’ पण तितकाच तीव्र संघर्ष?
जिल्ह्यात या निवडणुका तिरंगी होतं असल्या तरी मुख्य लढत ही भाजपा व शिवसेना यांच्यातच होणार आहे. जिल्ह्यात पालकमंत्री पद, संघटनात्मक पकड आणि प्रचारयंत्रणा यावर भाजपाचे वर्चस्व आहे. तर दुसरीकडे, शिंदे गटाकडे दोन आमदारांची ताकद, आणि कणकवलीत उबाठा सहभागी असलेल्या शहर विकास आघाडीतील सहभाग त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्ता हिसकावण्यासाठी सत्तेतील प्रमुख दोन्ही पक्ष पूर्ण ताकदीने उतरतील हे जवळपास निश्चित आहे.
त्यामुळे भाजपा कडून ’मैत्रीपूर्ण लढत’ अशी प्रतिमा पुढे केली जात असली तरी प्रत्यक्षात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या महत्वच्या निवडणूका अनुषंगाने जिल्ह्यातील सत्ता वर्चस्व, पक्षसंघटनेचा प्रभाव, आगामी जि.प.व पं.स. निवडणूक तयारी या सर्वांची ‘लिटमस टेस्ट’ या निवडणुकीत होणार एवढं मात्र नक्की आहे.
सिंधुदुर्गवर वर्चस्व कोण सिद्ध करणार?
भाजपासाठी ही प्रतिष्ठेची लढत, तर शिंदे शिवसेनेसाठी संघटनशक्ती दाखवण्याची सुवर्णसंधी आहे. त्यातच उबाठा शिवसेनेच्या स्वतंत्र हालचालींमुळे कणकवलीसह अनेक ठिकाणचे राजकीय पट अधिकच रंगू लागले आहेत. कणकवलीत तर ‘वेगळीच’ राजकीय चाल खेळली गेलीय. दोन्ही शिवसेनेनी राज्यात बिलकुल एकमेकांशी जवळीकता न ठेवण्याचे ठाम निर्णय असताना कणकवलीत मात्र उबाठा व शिंदे शिवसेना या दोघांच्या हालचाली वेगळाच 'संदेश' देत आहे.
पालकमंत्री नितेश राणेंना राजकीय ’शह’ देण्याच्या तयारीत उबाठा गट असतानाच आता शिंदे शिवसेना व राजन तेली यांच्या तिरक्या चालीने जिल्ह्यातील राजकीय जाणकार मात्र बूचकळ्यात पडले आहेत. “राज्यात तुझं–माझं जमेना, आणि कणकवलीत तुझा गळा–माझा गळा” अशी अनोखी युती आकार घेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरते आहे.
हवामान बदलतंय आणि राजकीय वातावरणही !
जिल्ह्यात सध्या सत्ता विरुद्ध सत्ता, साथीदार विरुद्ध साथीदार अशीच हवा बहुतेक ठिकाणी जाणवत आहे. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे अजूनही काही दिवस शिल्लक आहेत. यात बुधवारी तर नितेश राणे यांनी थेट शिंदे शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांना भाजपा उमेदवार श्रद्धांराजे भोसले यांना बिनविरोध निवडून देण्याचं खुलं आवाहन केलंय. त्यामुळे आता पुढील २ दिवसात उमेदवारी प्रक्रियेतील घडामोडी, युती - आघाड्यांचे अंतिम निर्णय, बंडखोरांची भूमिका हे सर्वच या निवडणुकीचे खरे चित्र ठरवणार आहेत. असं असलं तरी तूर्तास मात्र जिल्ह्यात "सत्ता विरुद्ध सत्ता" धारीच उभे ठाकल्याचे चित्र आहे.
संदीप देसाई
संपादक
कोकणसाद LIVE - दै. कोकणसाद










