सेना - भाजप राडा ; रस्त्यावर भांडले, पोलीस ठाण्यात भिडले

Edited by: विनायक गांवस
Published on: December 02, 2025 20:13 PM
views 314  views

सावंतवाडी : शहरात सायंकाळी शेवटच्या टप्प्यात मतदान सुरू असताना शिवसेना-भाजपात राडा झाला. भाजप युवा नेते विशाल परब यांच्या खासगी बॉडीगार्डच्या ताब्यात असलेली कार शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या अंगावर घालण्याच्या प्रकार झाल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. यातून मोठा वादंग होऊन बॉडीगार्डला मारहाणीचा प्रकार घडला. तसेच शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. पोलिस ठाण्यात देखील दोन गटांतील कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या अंगावर धावून जात धमकी देण्याचा प्रकार झाला. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब व भाजप युवा नेते विशाल परब यावेळी पोलिस ठाण्यात उपस्थित होते. पोलिस उपअधीक्षक विनोद कांबळे, पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यावेळी उपस्थित होते.



 संतप्त शिवसैनिकांनी संबंधित बॉडीगार्डसह कार रोखून धरत ती पोलिसांच्या ताब्यात दिली. श्री. परब यांच्या संरक्षणार्थ असणारा पोलिस त्या गाडीत कसा ? असा सवाल त्यांनी केला. यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब व भाजप युवा नेते विशाल परब यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यातच हुज्जत घातली. यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सावंतवाडी शहरात निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागले.



सावंतवाडी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी सावंतवाडी शहरात सर्वत्र शांततेत मतदान सुरू असताना प्रभाग क्रमांक सात मध्ये सुरुवातीला पैसे वाटपाचे संशयावरून धक्काबुक्की आणि बाचाबाचीचा प्रकार घडल्यानंतर, सायंकाळी पुन्हा एकदा या प्रकाराने शहरातील शांतता बिघडण्याचा प्रकार घडला. 




प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते बुथवर उभे असताना विशाल परब यांच्या खाजगी बॉडीगार्डच्या ताब्यात असलेली स्कॉर्पिओ कार त्या ठिकाणी असलेल्या ज्ञानेश पाटकर नामक युवकाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला. यामध्ये सुदैवाने तो बचावला. झालेल्या प्रकारानंतर तेथे उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी तात्काळ त्या स्कॉर्पिओ कारसह ती कार चालवीत असलेल्या खाजगी बॉडीगार्ड ला घेरले. यावेळी त्या कारमध्ये विशाल परब यांच्या पोलीस सुरक्षेमधील पोलीस कर्मचारीही बसलेला होता. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक बनले. यावेळी बॉडीगार्डला उपस्थितांकडून चोपही दिला गेला. प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी घटनास्थळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासह पोलीस फाटा हजर झाला. त्यांनी हे प्रकरण मिटण्याचा प्रयत्न केला. परंतु घटनास्थळी दाखल झालेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यासह कार्यकर्त्यांनी कार पोलिसांनी ताब्यात घ्यावी अशी मागणी लावून धरली. यावेळी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत प्रकार केला. संबंधित खाजगी बॉडीगार्ड कडून अरेरावीची भाषा करण्याचा प्रकार घडल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. परंतु,पोलिसांनी मध्यस्थी केल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. भाजपचे उमेदवार ॲड अनिल निरवडेकर यांनी मध्यस्थी करत वातावरण शांत केले.



दरम्यान, पोलिसांनी संबंधित गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये भाजपचे झेंडे वगळता कुठल्याही प्रकारची रोकड किंवा अन्य संशयास्पद वस्तू आढळून आली नाही असे सांगितले. सकाळपासून शहरात सुरु असलेला या छोट्या मोठ्या प्रकारांना रोखण्यास पोलीस यंत्रणा सपसेल अपयशी ठरली असा आरोप जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केला. तर शांत सावंतवाडी अशांत करण्याचा हा प्रकार असून आम्ही असले प्रकार कदापी खपवून घेणार नाही, अशा प्रकारांना जशास तसे उत्तर दिले जाणार आहे असे संजू परब म्हणाले. 

तर संबंधित कारचालक हा मद्यधुंद अवस्थेत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.



दरम्यान, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात भिडले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब व भाजप युवा नेते विशाल परब उपस्थित होते. पोलिसांनी वेळीच आक्रमक पवित्रा घेत गर्दी पांगवली.  यावेळी दोन्ही गटांचे शेकडो कार्यकर्ते पोलिस ठाण्यात दाखल झाले. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आत जाण्यास रोखल्याने त्यांनी पोलिसांची हुज्जत झाली.