मालवणात उद्या 'शिवायन'

आमदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
Edited by:
Published on: March 15, 2025 19:43 PM
views 23  views

मालवण :  कुडाळ-मालवण मतदासंघाचे शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या १६ मार्च रोजी मालवण टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर सायंकाळी 'शिवायन' या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच नीलेश राणे यांचा वाढदिवस मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख  दत्ता सामंत यांनी दिली. 

आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस १७ मार्च रोजी असून त्यांच्या वाढदिवसाचा केक १६ रोजी नाटकाच्या निमित्ताने कार्यकर्ते आणि पदाधिकारी व मान्यवर यांच्या उपस्थितीत कापण्यात येणार आहे. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने जनतेचे प्रतिनिधी, आमदार नीलेश राणे अधिवेशनात आहेत. त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे, जनतेचे मांडले जाणारे प्रश्न पाहता कार्यतत्पर असे हक्काचे आमदार जनतेने निवडून दिले हा अभिमान वाटतो आहे. १७ मार्च रोजी त्यांचा वाढदिवस आहे. मात्र, आमदार अधिवेशनात असल्याने १६ मार्च रोजी मालवण-कुडाळ मतदारसंघात त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यावेळी माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री नीतेश राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार किरण सामंत यांच्यासह महायुतीचे सर्व नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा होणार असल्याची माहिती श्री. सामंत यांनी दिली.

आमदार नीलेश राणे यांचा वाढदिवस भव्य दिव्य स्वरूपात सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. १६ मार्च रोजी टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर हिंदवी स्वराज्य निर्मितीचे वैभवशाली शिवपर्व 'शिवायन' या सुमारे २०० कलावंतांच्या सहभागातील महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपतींचा इतिहास या नाटकानिमित्ताने नाट्यरसिकांसमोर मांडण्यात येणार आहे. हे महानाट्य सर्वसामान्य शेतकरी, महिला भगिनी यांनाही पाहता यावे, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. बोर्डिंग मैदानावर सुमारे पंधरा ते वीस हजार नाट्यरसिकांची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही श्री. सामंत म्हणाले. आमदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एका रुग्णवाहिकेचे लोकार्पणही करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मतदार संघातील जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये मेडिकल किट उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहिती सामंत यांनी यावेळी दिली.