
कणकवली : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने दुर्गराज राजधानी रायगडावर 5 आणि 6 जून रोजी शिवराज्याभिषेक समितीचे मार्गदर्शक छत्रपती शिवरायांचे वंशज युवराज संभाजी महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर 1674 साली 6 जून रोजी राज्याभिषेक झाला आणि संपूर्ण हिंदुस्थानात पहिले हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. भारतीय आरमाराचे जनक असलेले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अवघ्या महाराष्ट्राची आणि संपूर्ण हिंदुस्थानची अस्मिता आहे. शिवरायांच्या प्रेरणेने मर्द मराठयानी आपल्या तलवारीच्या धारेवर पराक्रम गाजवला. त्यातूनच हिंदवी स्वराज्याचे स्वप्न 6 जून 1674 रोजी साकार झाले. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या ऐतिहासिक क्षणांची स्मृती सदैव राहावी यासाठी दरवर्षी राजधानी रायगडावर मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जाते. यावर्षीही गुरुवार दिनांक 5 आणि शुक्रवार दिनांक 6 जून रोजी किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
रूपरेषा पुढीलप्रमाणे : 5 जून रोजी दुपारी 3 वा: 30 मिनिटांनी राजमाता जिजाऊ यांच्या पाचाड येथील समाधीस्थळी राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस अभिवादन करून शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रारंभ केला जाणार आहे. दुपारी 4 वाजता युवराज संभाजी महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे भव्य स्वागत केल्यानंतर नाणे दरवाजा येथून शिवभक्तांसोबत पायी रायगड चढण्यास सुरुवात. दुपारी 4 वा.15 मि. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती व रायगड जिल्हा प्रशासन यांच्या उपस्थितीत नगारखाना येथे गडपूजन, दुपारी 4 वा.30 मि. युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती महाराज यांच्या हस्ते होळी चा माळ येथे धार तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची कार्यक्रमातील युद्धकलेच्या प्रत्यक्षिकांस सुरुवात होईल.सायं. 7 वाजता होळीचा माळ येथे ढोलवादन, लेझीम प्रात्यक्षिके, वारकरी संप्रदायाकडून टाळ मृदुंगाचा गजर. रात्री 8 वा. जागर शिवशाहिरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा हा शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम राजसदरेवर सादर होईल.रात्री 9 वा. शिरकाई मंदिर येथे गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ सादर होईल. रात्री 9 वा.30 मि. जगदीश्वर मंदिरात वारकरी संप्रदायाकडून कीर्तन व भजन होईल.
शुक्रवार 6 जून रोजी सकाळी 7 वा. युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या शुभहस्ते नगारखाना येथे पारंपरिक वाद्यांच्या गजरात ध्वजपूजन व ध्वजारोहण. सकाळी 7 वा.30 मि. राजसदर येथे शाहिरी कार्यक्रम. सकाळी 9 वा. 30 मि. श्री शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे राजसदरेवर आगमन. सकाळी 9 वा. 50 मि. युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे राजसदरेवर आगमन. सकाळी 10 वा. युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या शुभहस्ते श्री शिवछत्रपती महाराजांच्या उत्सवमूर्तीस अभिषेक. सकाळी 10 वा. 20 मि. श्री. शिवछत्रपती महाराजांच्या राजसदरेवरील सिंहासनारूढ मूर्तीस सुवर्ण मुद्रांचा अभिषेक. सकाळी 10 वा.30 मि. युवराज छत्रपती संभाजी महाराज यांचे शिवभक्तांना संबोधन. सकाळी 11 वा. "सोहळा पालखीचा..स्वराज्याचा ऐक्याचा " शिवराज्याभिषेक पालखी सोहळ्यास प्रारंभ. दुपारी 12 वा. श्री शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे जगदीश्वर मंदिरात आगमन. दुपारी 12 वा. 15 मि. युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्याकडून वारकरी संप्रदायास पंढरीच्या वारीसाठी मानाचा ध्वज प्रदान. दुपारी 12 वा. 25 मि. श्री शिवछत्रपती महाराजांच्या समाधीस अभिवादन केले जाणार आहे.
हा ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी दुर्गराज रायगडावर 5 जून आणि 6 जून रोजी शिवभक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.